उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून जयकुमार गोरे यांच्या दिल्लीत फेऱ्या, अनिल देसाई यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 11:55 AM2024-07-11T11:55:37+5:302024-07-11T11:56:22+5:30

ट्रेलर दाखवला, विधानसभेला पिक्चर दाखवणार

Jayakumar Gore visits to Delhi to prevent Udayanraj from getting candidature, Anil Desai allegation  | उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून जयकुमार गोरे यांच्या दिल्लीत फेऱ्या, अनिल देसाई यांचा आरोप 

उदयनराजेंना उमेदवारी मिळू नये म्हणून जयकुमार गोरे यांच्या दिल्लीत फेऱ्या, अनिल देसाई यांचा आरोप 

दहिवडी : खासदार उदयनराजे भोसले यांना तिकीट देऊ नये म्हणून आमदार जयकुमार गोरे यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या. उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अडचणीत आहे असं यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी भाजप नेतृत्वाला सांगितलं. हे सगळं उदयनराजेंना कळलं. त्यामुळेच खासदार झाल्यानंतर उदयनराजे हे भाजपच्या कार्यालयात ज्यावेळी गेले, त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा तिथे लावलेला आमदार गोरेंचा फोटो बाहेर फेकून दिला होता, असा गौप्यस्फोट सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला आहे.

दहिवडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात दि. ९ पत्रकार परिषदेत अनिल देसाई बोलत होते. देसाई म्हणाले, वरकुटे मलवडी गावाने दहा वर्षे आमदार, अकरा वर्षे सभापती, सहा जिल्हा परिषद सदस्य, तीन उपसभापती अशी वेगवेगळी पदे भूषविली आहेत. परंतु, ज्यांना त्यांच्या बोराटवाडी गावातून हाकलून काढलं होतं ते आता आमची लायकी काढतायत. लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी सांगितले की ते ज्या उमेदवाराला सांगतील त्याला उमेदवारी दिली तर निवडून आणायची जबाबदारी घेतील. हा उमेदवार जर पडला तर पुन्हा विधानसभेला उभा राहणार नाही, हे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितले असून याला साक्षीदार आहेत.

त्यांनी दिलेला खासदार तर पडलाच. पण त्यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे बरेचसे खासदार पडलेत. आम्ही काबाडकष्ट करून, व्यवसाय करून पैसे कमावलेत. यांच्यासारख्या चोऱ्या, लबाड्या करून पैसे कमवले नाहीत. आमच्याकडे पैसे आहेतच अन् ते तुम्हाला धडा शिकवण्यासाठी शंभर टक्के वापरणार आहोत. अमित शाह यांच्यासारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा समजून अधिकाऱ्यांना हाताशी धरून गोरगरीबांना त्रास देणं हा यांचा उद्योग असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

ट्रेलर दाखवला, विधानसभेला पिक्चर दाखवणार

गोरे यांच्या पायाखालची वाळू सरकलीय म्हणून असे बोलत आहेत. आपला पराभव निश्चित आहे म्हणून हे असं घाणेरडं बोलतायत. खरंतर यांची पात्रता नसली तरी यांनी आमदारकीच्या पदाची तरी लाज राखली पाहिजे. राजकारण व समाजकारणाला कलंक लावणारे हे लोकप्रतिनिधी आहेत. मला पूर्ण खात्री आहे, या आमदारांचा पराभव केल्याशिवाय आम्ही राहत नाही. मला आता त्यांना एवढंच सांगायचंय, लोकसभेला ट्रेलर बघितलाय. आता विधानसभेला पिक्चर दाखवणार आहोत. तुम्हाला तीन महिन्याच्यावर आमदार राहू देत नाही, असा इशारा देसाई यांनी दिला.

Web Title: Jayakumar Gore visits to Delhi to prevent Udayanraj from getting candidature, Anil Desai allegation 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.