रेटून खोटं बोलण्यात जयकुमार पटाईत!
By admin | Published: October 27, 2015 11:06 PM2015-10-27T23:06:34+5:302015-10-28T00:03:09+5:30
शेखर गोरेंचा पलटवार : कामाचे श्रेय घेऊन फलक लावल्यास उखडून टाकण्याचा इशारा
म्हसवड : देवापूर गावची ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून विरोधकांकडून माझ्या कार्यकर्त्यांना दमबाजी सुरू असून, ती त्यांनी थांबविली नाही तर गाठ शेखर गोरेंशी असल्याचा इशारा देत विद्यमान आमदार इतरांच्या कामाचे श्रेय घेण्यास पटाईत असून, आजवर त्यांचे विरोधक शांत बसत होते. ते खोटं बोल पण रेटून बोलण्यात पटाईत आहेत. माझ्या कामाचे श्रेय घेऊन विकासकामाचा त्यांनी यापुढे बोर्ड लावल्यास तो उखडून टाकण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रीय समाजपक्षाचे सरचिटणीस शेखर भाऊ गोरे यांनी दिला.
देवापूर ग्रामपंचायतीच्या त्यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढवत असलेल्या शंभू महादेव ग्रामविकास पॅनेलच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष युवराज बनगर, प्रा. विश्वंभर बाबर, सरपंच कांचन बाबर, रासपाचे आप्पासाहेब पुकळे, मार्केट कमिटीचे संचालक कैलास भोरे, शहाजी बाबर, किरण बाबर, शेखरभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू जाधव, तुषार विटकर यावेळी उपस्थित होते.
शेखर गोरे म्हणाले, ‘देवापूर गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वोतोपरी मदत यापुढील काळात केली जाईल. येथील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी मी कटिबद्ध असून, येथील जनतेला शंभू महादेव ग्रामविकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. ते पुढे म्हणाले, ‘सर्वसामान्य युवकांच्या पाठबळावर विधानसभा निवडणुकीत नंबर दोनची ५३ हजार मते घेतली. त्यावेळी माझ्याबरोबर युवकांची संख्या मोठी होती परंतु आता माझ्या बरोबर युवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेचे पाठबळ वाढत आहे. (प्रतिनिधी)
सर्वसामान्यांचे पाठबळ महत्त्वाचे
यापुढील काळातील सर्व निवडणुका सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर व विश्वासावर जिंकून दाखवेन असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.’ यावेळी बोलताना युवराज बनगर म्हणाले, ‘शेखरभाऊंच्या रुपाने जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक स्वखर्चातून करणारे नेतृत्त्व आम्हाला लाभले असून, या नेतृत्त्वाने कोण कोणत्या पक्षाचा हे न पाहता सर्वसामान्यांना जी आर्थिक मदत केली त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. प्रा. विश्वंभर बाबर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.