जयंत पाटील-श्रीनिवास पाटील यांच्या बंद खोलीतील चर्चेमुळे तर्कवितर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 11:48 AM2023-12-27T11:48:57+5:302023-12-27T11:50:00+5:30

सातारा लोकसभेसाठी महायुतीकडूनही मोर्चबांधणीला वेग

Jayant Patil Shriniwas Patil Argument due to closed debate | जयंत पाटील-श्रीनिवास पाटील यांच्या बंद खोलीतील चर्चेमुळे तर्कवितर्क

जयंत पाटील-श्रीनिवास पाटील यांच्या बंद खोलीतील चर्चेमुळे तर्कवितर्क

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करू लागले असून वरिष्ठ नेत्यांचेही जिल्ह्यात दौरे सुरू होऊ लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फलटण तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही अचानक कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. भेटीत जवळपास अर्धा ते पाऊण तास कमराबंद चर्चा झाली. भेटीत काय चर्चा झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

सातारा लोकसभा मतदार संघात पूर्वी राष्ट्रवादी बळकट होती. तथापि, सध्या लोकसभेत सहा मतदार संघांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा एकच आमदार आहे. उर्वरित पाचपैकी भाजप १, अजित पवार गट १, शिवसेना शिंदे गट २ आणि काँग्रेस १ अशी संख्या आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारीवर दावा केला जात आहे. महायुतीमध्येही साताऱ्याच्या जागेवर तिन्ही पक्षांचे नेते दावा करू लागले आहेत. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेचे उमेदवारी द्यावी, अशीही मागणी काही दिवसांपूर्वी झाली होती. 

अशा वेळी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) कडूनच उमेदवार ठरवला जाण्याची शक्यता आहे. अद्याप कोणत्याही इच्छुक उमेदवाराने दावा केला नसला तरी खासदार श्रीनिवास पाटील यांचेच नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा सारंग पाटील यांच्या नावाचीही चर्चा आहे. तथापि, अशा वेळी राष्ट्रवादीकडे अन्य कोणता पर्याय आहे का? याचीही चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. मंगळवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कऱ्हाड येथे भेट दिली. या भेटीत बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

खासदार पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने भेट?

खा. श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आजारी असल्याने ही भेट असल्याचे सांगितले जात आहे; परंतु या भेटीत खासदार आणि प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यामध्ये कमराबंद चर्चा झाल्याने चर्चेत नक्की काय? याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

Web Title: Jayant Patil Shriniwas Patil Argument due to closed debate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.