जयंत पाटील, तुम्ही लवकरच सभागृहात असाल; पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:18 PM2024-07-16T15:18:16+5:302024-07-16T15:18:53+5:30
मी खोकी कोठून आणू : जयंत पाटील
कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांचा विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव आम्हा सर्वांच्या जिव्हारी लागला आहे; पण जयंतराव तुम्हाला लवकरच सभागृहात आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला प्रतिसाद दिला.
कऱ्हाड येथे माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या जयंतीनिमित्त कोयना सहकारी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचा उद्घाटन समारंभ व विलासराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण असा संयुक्तिक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून चव्हाण बोलत होते.
यावेळी भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील, माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी मंत्री आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार संग्राम थोपटे, श्रीमंत पाटील, काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना केवळ सवंग लोकप्रियतेच्या घोषणा करून चालत नाही, तर काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मी मुख्यमंत्री असताना राज्य बँकेबाबत धाडसी निर्णय घेतला. म्हणूनच ती बँक आज वाचली आहे.
मी खोकी कोठून आणू : जयंत पाटील
जयंत पाटील म्हणाले, खरंतर आजचा हा कार्यक्रम ठरवताना ॲड. उदयसिंह पाटील यांनी पहिल्यांदा माझी वेळ घेतली होती. मी त्यांना येण्याचा शब्द दिला होता. म्हणून तर परवा निवडणुकीत हरलो तरी आज इथे आलो आहे. पण, अलीकडे शब्द पाळणारी लोकं कमी राहिली आहेत. सगळी माणसं खोक्याची होत आहेत. मी खोकी कोठून आणू? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.