जयंत पाटील यांचा धूर्तपणा आणि राजकीय खेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:30 AM2021-05-30T04:30:27+5:302021-05-30T04:30:27+5:30
त्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा कारखान्याकडे बघण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे. त्यामुळे ‘कृष्णे’च्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ राहते. ...
त्यांच्या मतदारसंघाच्या सीमेवर असणाऱ्या कृष्णा कारखान्याकडे बघण्याचा त्यांचा उद्देश हाच आहे. त्यामुळे ‘कृष्णे’च्या प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका तटस्थ राहते. ‘कृष्णा’तील सर्व गटांमध्ये त्यांचे कार्यकर्ते विखुरले आहेत. याही निवडणुकीत त्यांनी मौन पाळले आहे.
नेर्ले-तांबवे गट विधानसभेच्या शिराळा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचे वर्चस्व आहे. मात्र, या गटातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. या गटात स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीतच वेगवेगळे गट आहेत. त्यामुळे कार्यकर्ते ‘कृष्णे’च्या रणांगणात पक्षीय राजकारणाला फाटा देऊन उतरतात. अशीच परिस्थिती बोरगाव-रेठरेहरणाक्ष गटात आहे. या गटात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील हे सहकार पॅनलमधून विद्यमान संचालक आहेत. बोरगाव जिल्हा परिषद गटातही त्यांचेच वर्चस्व आहे. तेथे जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटील आपल्या कार्यकर्त्यांना बळ देतात; परंतु ‘कृष्णे’ची निवडणूक मात्र दुर्लक्षित करतात.
जयंत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना सोबत घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे; परंतु कदम यांनी ‘कृष्णे’च्या निवडणुकीत रयत पॅनलचे डॉ. इंद्रजित मोहिते यांची पाठराखण केली आहे. त्यावरही जयंत पाटील यांनी मौन पाळले आहे.
इस्लामपूर मतदारसंघातील बहुतांशी कार्यकर्त्यांना राजारामबापू उद्योग समूहात संधी मिळत नाही, असे कार्यकर्ते स्वबळावर कोणत्याही गटातून निवडून गेले तरी जयंत पाटील हरकत घेत नाहीत. कारण तो कार्यकर्ता आपल्यापासून दुरावला जाणार नाही, याची काळजी घेण्याचा धूर्तपणा त्यामागे आहे.
- अशोक पाटील, इस्लामपूर