जयश्री गिरी यांच्या घरावर हल्ला
By Admin | Published: December 26, 2016 11:47 PM2016-12-26T23:47:55+5:302016-12-26T23:47:55+5:30
पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल : राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप
मेढा : महिगाव, (ता. जावळी)च्या उपसरपंच व जावळी पंचायत समितीचे माजी सभापती सुहास गिरी यांच्या पत्नी जयश्री गिरी यांच्या घरावर हल्ला करून घरासह तीन वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वैभव शितोळे (रा. सायगाव) याच्यासह आणखी पाचजणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापैकी तिघांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, हे सारे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचे व यांनी हल्ला केल्यानंतर ‘ऋषीभाई शिंदे जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचे जयश्री गिरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत जयश्री गिरी यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, फिर्यादीत म्हटले आहे की, रविवार, दि. २५ रोजी रात्री एकच्या सुमारास मी घरात एकटी असताना वैभव शितोळे (रा. सायगाव), नितीन भोसले, सचिन सुंदर भोसले (रा. खर्शी), स्वप्निल डोंबे, सागर शिवणकर, अथर्व भोसले या सर्वांनी माझ्या घरावर लाथाबुक्क्यांनी व दगडांनी मारहाण करीत घराच्या पूर्व बाजूचा दरवाजा व खिडकीच्या काचा फोडल्या व घराच्या दरवाजासमोर असलेल्या गाड्या (एमएच ११ बीसी ७४७४) व (एमएच २० बीसी ३१६९) या दोन्ही गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडून सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान केले. यावेळी मी आरडाओरडा केल्यानंतर माझ्या घराशेजारी राहणारे विलास पवार, किशोर पवार, चेतन भोसले वगैरे माझ्या मदतीला धावून आल्यानंतर हे युवक दुचाकी व दोन चारचाकी वाहनांतून पळून गेले. यावेळी त्यांनी ‘ऋषीभाई जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘ऋषीभाईच्या नादाला लागाल तर खानदान खल्लास करू,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी मेढा पोलिसांनी वैभव शितोळे, नितीन भोसले, सचिन भोसले यांना अटक केली असून, अन्य तीनजणांवरही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी जयश्री गिरी यांच्या घराच्या दरवाजावर व वाहनांवर दगड मारून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४९, ३३६, ४४७, ४२७, ५०९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मेढ्याचे सहायक पोलिस निरीक्षक वैभव कढाळे करीत आहेत.