कोणतेही धार्मिक विधी न करता जयश्री पेठे यांचे देहदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 08:32 PM2018-08-25T20:32:09+5:302018-08-25T20:33:58+5:30
वडूज : येथील माजी ग्रामपंचायत सदस्या जयश्री अरुण पेठे (वय ७५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार कुटुंबीयांनी देहदान करून त्यांची अंतिम इच्छा पूर्ण केली. कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांचा देह कºहाड येथील कृष्णा हॉस्पिटलला दान केला.
पेठे काकू म्हणून परिचित असलेल्या जयश्री पेठे यांना सामाजिक कार्याची आवड होती. त्या पंचक्रोशीत ‘अन्नपूर्णा’ म्हणून परिचित होत्या. तसेच सतत हसरा चेहरा, सर्वांना मदत करण्याची भावना, स्पष्टवक्त्या स्वभावाच्या परंतु मनाने तेवढ्याच निर्मळ अशी त्यांची ख्याती होती. वडूज येथे असताना बऱ्याच सामाजिक उपक्रमात त्या हिरीरीने भाग घेत. महिला मंडळाच्या माध्यमातून वंचित महिलांना एकत्रित करून अनेक समाजपयोगी उपक्रम ही त्यांनी राबविले. लोकन्यायालयात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. समाजासाठी काहीतरी चांगले करायचे अशा विचारसरणीच्या पेठेकाकूंनी जिंवतपणीच देहदान करण्याची इच्छा कुटुंबात बोलून दाखविली होती. त्याप्रमाणे त्यांच्या निधनानंतर कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या हिमतीने त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदानाची प्रक्रिया पार पाडली.
वडूज शिक्षण मंडळाचे सचिव अरुण पेठे यांच्या पत्नी तर संचालक श्रीकृष्ण पेठे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.