जयवंत नानांचं ‘क्रिकेट’!
By admin | Published: January 8, 2016 11:34 PM2016-01-08T23:34:50+5:302016-01-09T00:37:57+5:30
जगदीश दादांची ‘कबड्डी’; निमित्त वाढदिवसाचं : वडगावकर म्हणताहेत ‘कुस्ती’ नको रे बाबा...! --कऱ्हाड फोकस
प्रमोद सुकरे - कऱ्हाड --नेत्यांचे वाढदिवस अन् विविध कार्यक्रम हे आता समीकरणच झाले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेता कुठलाही असो, त्यांचे वाढदिवस धुमधडाक्यात होताना दिसतात. त्यानिमित्त सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा असे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याला कऱ्हाड तालुक्यातलं वडगावही अपवाद नाही. येथील राजकारणात सक्रिय असणाऱ्या दोन सख्ख्या भावांच्या वाढदिवसानिमित्त समर्थकांनी क्रीडा स्पर्धा घेतल्या. यामध्ये त्यांनी कबड्डी अन् क्रिकेट या दोन सांघिक खेळांची निवड केली. कारण वडगावकर म्हणताहेत ‘कुस्ती’ अन् वडगावात नको रे बाबा...!
कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात वडगाव गावाला मोठं महत्त्व आहे. लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या या गावाचा राजकारणातही तेवढाच मोठा दबदबा आहे. माजी मंत्री दिवंगत दादासाहेब जगताप याच गावचे! त्यांच्याच राजकीय, सामाजिक कार्याचा वारसा त्यांचे पुतणे जगदीश जगताप (दादा) व जयवंत जगताप (नाना) सांभाळत आहेत. सध्या जगदीशदादा यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत. तर जयवंतनाना जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम करीत आहेत. पण सध्या ‘एका म्यानात या दोन तलवारी बसत नाहीत म्हणे...!’
खरंतर दादासाहेब जगताप यांचा राजकीय वारसा जगदीशदादाच सांभाळत होते; पण जयवंत उर्फ बंडानाना अपघातानेच राजकारणात आले. जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्यावरच येऊन पडली. सारं काही ठीक चाललं होतं पण गेल्या विधानसभेत दादांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. तर नानांनी काँग्रेसचा, अन् सुरू झाली दोघांमध्ये धुसफूस!
या दोन्ही भावांवर गावकऱ्यांचं अफाट प्रेम आहे; पण आज साऱ्यांना जणू ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करायला लागतोय. २0१५ या वर्षाला निरोप देताना ३0 डिसेंबरला जयवंतनानांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यांच्या चाहत्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे उद्घाटन स्वत: नानांनी श्रीफळ वाढवून केलं. यावेळी कऱ्हाडातले एक ‘कॅप्टन’ आवर्जून उपस्थित होते. तर बक्षीस वितरणाला घाटावरच्या पुढाऱ्यांनी एका युवा नेत्याला पाठविले होते. त्यानंतर लगोलग नव्या वर्षात दादांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने कबड्डी स्पर्धा घेतल्या होत्या. त्याचे उद्घाटन करायला कृष्णेचे डॉक्टर युवा नेते अन् उत्तरच्या आमदारांचे भाऊ आवर्जून उपस्थित होते.
या दोन्ही स्पर्धांना खेळाडूंसह क्रीडा प्रेमींनी मोठा प्रतिसाद दिला. दोघांनाही शुभेच्छा द्यायला तालुक्यातील मान्यवरांसह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. कबड्डी अन् क्रिकेटच्या स्पर्धां पाहायला गेलेल्या अनेक शौकिनांनी कुस्ती पण घ्यायला हरकत नव्हते, असे मत व्यक्त केले. त्यावर हुशार वडगावकरांनी ‘कुस्ती’ अन् वडगावात नको रे बाबा...! अशा बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. वडगावकरांना नेमकी कोणती आणि कोणाची कुस्ती नको आहे, हे लक्षात यायला हरकत नाही. पण ज्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्यांनी याकडे लक्ष दिले तर बरे...असे म्हणतात ‘समझनेवालोंको इशारा काफी है।’
फलकांवर एकत्र ‘भाई-भाई’
या दोन भावांच्या वाढदिवसांचे कार्यक्रम जरी स्वतंत्र झाले, स्पर्धा जरी वेगवेगळ्या झाल्या तरी त्या दोघांना एकत्रित शुभेच्छा देणारे अनेक फलक अजूनही वडगाव परिसरात झळकत आहेत. हे फलक जणू ‘इतक्या काही दूर गेल्या नाहीत, तुमच्या आमच्या वाटा’ असे तरी सुचित करीत नसतील ना? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.