जयवंत शुगर्सचा दीडशे रुपयांचा दुसरा हप्ता खात्यावर वर्ग : भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:12+5:302021-06-25T04:27:12+5:30
कऱ्हाड : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन दीडशे रुपयांचा ...
कऱ्हाड : धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन दीडशे रुपयांचा दुसरा हप्ता कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कोरोना काळात जयवंत शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिलाची रक्कम उपलब्ध करून दिल्याने, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जयवंत शुगर्सने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १६० दिवसात ६ लाख ७६ हजार २९० मेट्रिक टन ऊसगाळप केले. सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के राहिला. ७ लाख २५ हजार ७०० क्विंटल साखर निर्मिती कारखान्याने केली आहे. कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पात आजअखेर ८३ लाख ४४ हजार लिटर अल्कोहोलची निर्मिती करून, त्यातून ८० लाख १८ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे. या इथेनॉलची विक्री विविध ऑईल कंपन्यांना करण्यात आली आहे.
जयवंत शुगर्सने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम ३०५० रुपयांपैकी २६०० रुपयांचा पहिला हप्ता जमा केला आहे. एफआरपीचा दुसरा १५० रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने, शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी आजअखेर प्रतिटन २७५० रुपये प्राप्त झाले आहेत.