मुख्यमंत्र्यांवर मायभूमीत जेसीबीने पुष्पवृष्टी, जिल्हा सीमेवर स्वागत, कार्यकर्त्यांची उपस्थिती; झाडून सारे अधिकारी हजर
By दीपक शिंदे | Published: August 11, 2022 10:56 PM2022-08-11T22:56:29+5:302022-08-11T22:57:37+5:30
Eknath Shinde: सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच जिल्हा दाैऱ्यावर गावी आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने गुलाबाची पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले.
सातारा - सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रथमच जिल्हा दाैऱ्यावर गावी आले आहेत. यामुळे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने गुलाबाची पुष्पवृष्टी करीत जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. तर जिल्हा प्रशासनातील झाडून सारे अधिकारी हजर होते.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी आले आहेत. जिल्हा प्रशासन आणि भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. सातारा-पुणे जिल्ह्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांबरोबर अधिकारी, पोलिसांनी हजेरी लावली होती. मंत्री शंभूराज देसाई हेही मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत करण्यासाठी शिरवळच्या शासकीय विश्रामगृहात आले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्याच्या सीमेवर आगमन झाले. या वेळी मंत्री देसाईही होते.
आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत व जेसीबीने गुलाब फुलांची पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्वागत केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, फलटण पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, खंडाळा तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.