जीपच्या धडकेने बालक ठार
By admin | Published: February 19, 2015 11:08 PM2015-02-19T23:08:52+5:302015-02-19T23:39:07+5:30
कांबीरवाडीजवळ अपघात : रस्त्यालगत उभारलेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला
मसूर : कांबीरवाडी (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत जीपच्या धडकेने ऊसतोडणी मजुराच्या तीन वर्षीय बालकाचा
मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास उंब्रज-मसूर रस्त्यावर झाला. सुमित गोविंद बद्देवाड असे त्या बालकाचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, वारणा साखर कारखान्याची ऊसतोडणी मजुरांची टोळी कांबीरवाडी गावच्या हद्दीत ऊसतोड करत आहे. यातील ऊसतोड मजुरांची मुले गुरुवारी दुपारी रस्त्याकडेला उभी होती. त्यावेळी पालीच्या खंडेरायाच्या दर्शनानंतर भाविकांना घेऊन मसूरकडे निघालेल्या जीप (एमएच १० सी ९८३५)ने रस्त्याकडेला उभे असलेल्या सुमित बद्देवाड (रा. बेळ्ळी खुर्द, ता. मुखेड, जि. नांदेड) या बालकास जोराची धडक दिली. यामध्ये सुमित गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोरखनाथ तुळशीराम हासबे (रा. हिवरे, ता. खानापूर, जि. सांगली) असे जीपचालकाचे नाव आहे. या अपघाताची फिर्याद या ऊसतोडणी टोळीचे मुकादम प्रेमदास तुकाराम पवार (रा. भवानीनगर तांडा, जि. नांदेड) यांनी मसूर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दूधभाते तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)