ज्वेलर्स दुकान फोडून सव्वालाखाचा ऐवज लंपास
By admin | Published: March 13, 2015 09:55 PM2015-03-13T21:55:29+5:302015-03-14T00:01:06+5:30
पंचनामा केला. घटनास्थळावरील हातांचे ठसे संकलित केले आहेत.
कऱ्हाड : वाठार, ता. कऱ्हाड येथील सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरट्यांनी तीन किलो चांदीसह सोन्याचे दागिने असा सुमारे सव्वालाखाचा ऐवाज लंपास केला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.वाठार येथे विजयकुमार यशवंत पाटील यांचे ग्रामपंचायतीनजीकच्या इमारतीच्या गाळ्यात अष्टविनायक ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. विजयकुमार पाटील हे गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी निघून गेले. शुक्रवारी सकाळी गाळा मालक पांडुरंग पाटील यांचा मुलगा अभिजित हा दुकानानजीक आला असताना दुकानाचे शटर उचकटल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने हा प्रकार मोबाईलवरून विजयकुमार यांना सांगितला. त्यानंतर काही वेळातच विजयकुमार दुकानाजवळ आले. त्यांनी दुकानात जाऊन पाहिले असता चोरट्यांनी आतील तीन कपाटे फोडल्याचे दिसून आले. कपाटातील तीन किलो चांदी, सोन्याचे दागिने असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक रमेश गर्जे कर्मचाऱ्यांसह त्याठिकाणी आले. त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळावरील हातांचे ठसे संकलित केले आहेत. याची नोंद कऱ्हाड तालुका पोलिसांत झाली आहे. (प्रतिनिधी)