मुंबई-सातारा प्रवासात सहा लाखांचे दागिने गेले चोरीला, घरात पोहोचल्यानंतर आले लक्षात
By दत्ता यादव | Published: April 20, 2023 04:17 PM2023-04-20T16:17:39+5:302023-04-20T16:17:53+5:30
अज्ञातावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सातारा : मुंबई ते सातारा प्रवासात अज्ञाताने बॅगमधील ६ लाख ६३ हजारांचे दागिने चोरून नेले. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारुती हरीबा उत्तेकर (वय ७५ मूळ रा. निप्पानी, ता. जावळी सध्या रा. राजभवन मुंबई) हे पत्नी आणि नातीसमवेत मुंबईहून बुधवारी रात्री साताऱ्याला येण्यासाठी निघाले. मुंबई-सांगली एसटीतून ते सकाळी सातारा एसटी स्टँडमध्ये उतरले. रिक्षाने सकाळी आठ वाजता घरात पोहोचले. त्यावेळी बॅगमध्ये दागिन्यांची पर्स नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या बॅगमध्ये चार तोळ्याचे सोन्याचे लाॅकेट्स, चार तोळ्यांच्या दोन वाट्या, मंगळसूत्र, अडीच तोळ्याचा लक्ष्मीहार, पाऊण तोळ्याची एक नथ, एक तोळ्याची अंगठी आणि ६०० रुपयांची रोकड होती.
उत्तेकर यांनी तातडीने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. मुंबई ते सातारा प्रवासादरम्यान नेमके दागिने कुठे चोरीला गेले, हे त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे या दागिन्यांचा शोध लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. पोलिस उपनिरीक्षक मोटे या अधिक तपास करीत आहेत.