तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 11:55 AM2022-07-20T11:55:07+5:302022-07-20T11:55:31+5:30

पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली

Jewelery worth thirteen lakhs was taken for one lakh, fraud of a jeweler worker in Satara | तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक

तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक

Next

सातारा : शहरातील एका प्रसिद्ध सराफ दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराची १२ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शाहुपुरी पोलीस ठाण्यात सांगलीतील एकावर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे १३ लाखांचे दागिने एका लाखात नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

विशाल चंद्रकांत नार्वेकर (वय ३९, रा.अन्नपूर्णाभवन, गवळी गल्ली सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील मोती चाैक परिसरात एका ज्वेलर्सची शाखा आहे. या शाखेमध्ये देवकुमार भगवान पाटील (वय ३६, रा.शनिवार पेठ, सातारा) हे सोने तपासणे व दागिने बनविण्याचे काम करतात. १० जानेवारी, २०२० रोजी ओळखीच्या विशाल नार्वेकर याने त्यांच्याशी संपर्क साधला.

‘माझ्याकडे एक लग्नाची मोठी ऑर्डर असून, एकाच घरातील दोघा भावांचे लग्न आहे. त्यांची पार्टी पैशाने मोठी असून, ते माझ्या खात्रीतील आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारातील एकूण ३७० ग्रॅमच्या आसपास सोन्याचे २२ कॅरेटचे दागिने लग्नकार्यात लागायचे आहेत. ते दागिने तुम्ही मला आपल्या दोघांच्या असलेल्या ओळखीवर व विश्वासावर द्यायचे,’ असे नार्वेकर याने सांगून देवकुमार पाटील यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर, १३ लाखांचे दागिने त्यामध्ये पॅडेट, डी.व्ही. बाली, ब्रेसलेट, मोहनमाळ, नेकलेस, हार, चेन, कानवेल, टाॅप्स अशा प्रकारचे दागिने तयार करण्यात आले. १२ जानेवारी, २०२० रोजी नार्वेकर याने हे दागिने नेताना एक लाख रुपये दिले. उरलेले १२ लाख रुपये १३ जानेवारी, २०२२ रोजी देतो, असे सांगून त्याने सर्व दागिने नेले.

पाटील यांनी अनेकदा नार्वेकरला पैसे मागितले. मात्र, उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, देवकुमार पाटील यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांनी विशाल नार्वेकरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Jewelery worth thirteen lakhs was taken for one lakh, fraud of a jeweler worker in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.