झुणका भाकर केंद्राचे सील तोडले !

By Admin | Published: March 5, 2017 11:25 PM2017-03-05T23:25:43+5:302017-03-05T23:25:43+5:30

बसस्थानकात तणावाचे वातावरण : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, जेसीबीने केंद्र उद्ध्वस्त करण्याच्या पोलिसांच्या हालचाली

Jhunka Bhakra center seal broke! | झुणका भाकर केंद्राचे सील तोडले !

झुणका भाकर केंद्राचे सील तोडले !

googlenewsNext



सातारा/शाहूपुरी : येथील मध्यवर्ती बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राला न्यायालयाच्या आदेशानंतर लावलेले सील रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तोडल्याचे एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही महिलांनी स्वत:ला आतमध्ये कोंडून घेतले होते. या प्रकारामुळे बसस्थानकात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. एसटी महामंडळाने न्यायालयात धाव घेऊन या झुणका भाकर केंद्राचा ताबा ९ फेब्रुवारीला घेतला होता. मात्र, ‘आमच्यावर अन्याय झाला आहे,’ असा आरोप करत दलित महिला विकास महामंडळाच्या महिलांनी त्याच ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
दरम्यान, रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पाच ते सहा महिला झुणका भाकर केंद्रामध्ये बसल्याच्या एस. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. आतून त्या महिलांनी कुलूप लावून स्वत:ला कोंडून घेतले. हा प्रकार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांनी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना या प्रकाराची कल्पना दिली. पाटील यांनी तत्काळ जादा कुमक घेऊन बसस्थानक गाठले. परंतु आतून महिलांनी कुलूप लावल्यामुळे त्यांना काहीच करता आले नाही. केवळ झुणका भाकर केंद्राची पाहणी करून त्यांनी बसस्थानकातील पोलिस चौकीमध्ये नीलम गिरी यांच्याशी तासभर चर्चा केली.
गिरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सल्ला घेतल्यानंतर त्या शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. परंतु इकडे बसस्थानकात मात्र पोलिसांकडून वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या होत्या. महिलांना आतून बाहेर कसे काढायचे, यासाठी पोलिसांची व्यूहरचना सुरू झाली. जेसीबी बोलावून घेतला. त्यावेळी आणखीनच वातावरण तणावग्रस्त झाले होते. झुणका भाकर केंद्रासमोर जेसीबी उभा राहिल्यानंतर आतील महिलांनी पटापटा खिडक्या बंद केल्या. तसेच केंद्राबाहेर असलेल्या दोन महिलांनी फोना-फोनी सुरू केली.
काही वेळानंतर चार पोलिसांना तेथे बंदोबस्तासाठी ठेवून इतर पोलिसांना ठाण्यात बोलावून घेण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत जेसीबीने झुणका भाकर केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी एसटी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. बसस्थानकात नेहमी उभ्या राहणाऱ्या एसटींनाही या प्रकारामुळे जास्त वेळ थांबू दिलं जात नव्हतं.
झुणका भाकर केंद्रातील वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. तरीसुद्धा एवढ्या उकाड्यातही महिला आतमध्ये बसल्या होत्या. पोलिस मात्र अधूनमधून खिडकीतून आतमध्ये डोकावत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Jhunka Bhakra center seal broke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.