जिजामाता बँक ‘सील’
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM2015-12-14T23:52:30+5:302015-12-15T00:52:35+5:30
पोलिसांची कारवाई : घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत पंचनामा
सातारा : जिजामाता सहकारी बँकेतील अपहारप्रकरणी लेखापरीक्षकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सोमवारी सायंकाळपासून पंचनाम्याची कारवाई सुरू केली. बँक ‘सील’ करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
जिजामाता बँकेच्या ‘राजधानी टॉवर्स’ येथील मुख्य कार्यालयाच्या आवारात शाहूपुरी पोलिसांची वर्दळ दुपारी अडीचपासूनच सुरू होती. सुमारे चार वाजता छाप्याची कारवाई सुरू झाली. पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, उपनिरीक्षक पी. बी. कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार शिंदे, हवालदार खरात, नाईक अजित घाडगे, डी. एस. कुंभार, एस. आर. देशमुख, एम. ए. वाघमळे, महिला कर्मचारी मीरा महामुनी, दीपा पवार यांचे पथक बँकेत दाखल झाले.
लेखापरीक्षक तानाजीराव जाधव यांनी गुरुवारी (दि. १०) शाहूपुरी ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. बोगस नोंदी करून अपहार केल्याप्रकरणी अध्यक्षा अॅड. वर्षा माडगूळकर, पती शिरीष कुलकर्णी यांच्यासह १९ संचालकांवर त्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या बाबींशी संबंधित कागदपत्रे आणि संगणकाच्या हार्ड डिस्क ताब्यात घेण्यास तसेच पंचनाम्यास सोमवारी सायंकाळी प्रारंभ केला. रात्री आठ वाजेपर्यंत कागदपत्रांशी संबंधित तपासणी सुरू होती. त्यानंतर हार्ड डिस्कसारखे डिजिटल पुरावे ताब्यात घेण्यास सुरुवात झाली, असे सूत्रांनी सांगितले. पुरावे ताब्यात घेऊन ‘सील’ करण्याची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)