जावळीत ‘शिंदें’चे मिले सूर मेरा तुम्हारा...
By admin | Published: September 25, 2015 10:41 PM2015-09-25T22:41:11+5:302015-09-26T00:16:33+5:30
निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता : राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण निघाले ढवळून
कुडाळ : कुडाळच्या दिवंगत राजेंद्र शिंदे यांनी दूध संघ निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्याच्या राजकारणात कसलाही संबंध नसलेले आमदार शशिकांत शिंदे यांचे नवे नेतृत्व तालुक्यात आणले व तेच नेतृत्व पुढे बहरले. मात्र त्यानंतर हुमगावचे शिंदेंनी कुडाळच्या शिंदेंचा गट संपविण्यासाठी कोणतीच राजकीय संधी सोडली नाही. अगदी कै. ला. बा. पतसंस्थेतही त्यांनी विरोधी पॅनेल उभे करुन टोकाचा विरोध दर्शविला तर जिल्हा बँकेचा हक्काचा सोसायटी मतदारसंघदेखील कुडाळच्या शिंदेंकडून घेतला. यावेळी आमदार शिंदेंना निष्ठावंत कार्यकर्त्यांनीच साथ दिली. हे निष्ठावंत कुडाळच्या शिंदेपासून दूर झाले तर आता हे सगळे विसरुन आमदार शिंदेंनी कुडाळच्या शिंदेंशी सूर जुळवल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातूनच आरोप-प्रत्यारोप होऊन तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तीन टर्म जावळीचे नेतृत्व करुन आता कोरेगावचे नेतृत्व करणाऱ्या आमदार शिंदेंनी जावळीतील आपले लक्ष कमी केले नाही. त्यांचेच १२ निष्ठावंत जिल्हा परिषद निवडणुकीत सौरभ शिंदेंच्या विरोधात राहिल्याने सौरभ शिंदेंना राजकीय कारर्कीदीला सुरुवात करतानाच पराभवाचा सामना करावा लागला. कुडाळच्या शिंदेंना हरविण्याची कोणतीच संधी आमदार शिंदेंनी सोडली नाही तर त्यांना वेळोवेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांनीही मोलाची साथ दिली. सहा महिन्यांत आमदार शिंदेंनी कुडाळच्या शिंदेंशी जुळवून घेतल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांवर त्यांच्याकडून अन्याय होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. बाजार समितीचे उपसभापती यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या जयदीप शिंदेंना बाजार समिती निवडणुकीत डावलून सोनगाव सोसायटीत पराभूत झालेल्या स्वीय सहायक मयूर देशमुख यांना बाजार समितीत स्थान देऊन एका निष्ठावंतावर अन्याय केला. तर राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख तानाजी शिर्केंना दिवंगत लालसिंगराव शिंदे (काका) यांच्या गटातून फोडून २००५ मध्ये उपसभापतिपद दिले. प्रतापगडच्या संचालकपदाचा राजीनामा स्वीकारुन त्यांच्यावर अन्याय होत असतानाही आमदार शिंदेंनी मौन धारण केले आहे की, या राजीनाम्यामागे त्यांचाच हात आहे, अशी चर्चा आहे. (प्रतिनिधी)
निष्ठावंतांमधील खदखद मालोजी शिंदेंकडून व्यक्त
शिर्के यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांमधील खदखद वाढली. त्यामुळे प्रतापगडचे संचालक मालोजीराव शिंदे यांच्यासारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांने आमदार शिंदे हे लबाडी करतात, असा थेट आरोप केल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय खदखदतंय हे प्रातिनिधीक स्वरुपात स्पष्ट झाले आहे. तर त्यांची ही टीका देखील आमदार शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागलेली दिसते.