जिमणवाडीची पुनर्वसन प्रक्रिया गतिमान
By admin | Published: October 2, 2014 09:52 PM2014-10-02T21:52:40+5:302014-10-02T22:24:42+5:30
संकट टळले : ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे प्रशासनाच्या हालचाली=लोकमतचा दणका
तारळे : गावकऱ्यांची एकजूट व प्रशासनाची तत्परता यामुळे जिमणवाडी, ता़ पाटण या गावच्या पुनर्वसन प्रक्रि येला गती मिळाली आहे़ चार-पाच वर्षांपासून रखडलेली ही पुनर्वसन प्रक्रिया गतिमान झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़
डोंगराच्या मध्यभागी उतारावर जिमणवाडी गाव वसले असून, जवळपास ४६ कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत़ दळणवळणाच्या सुविधा नसल्याने या गावाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते़ चार-पाच वर्षांपासून अतिवृष्टीने जमीन खचत जाऊन डोंगर माथ्यावरील तीन महाकाय दगड गावावर कोसळण्याच्या स्थितीत होते़ त्यामुळे गावावर टांगती तलवार होती़ रस्त्याची गैरसोय असताना ही गावाने ‘निर्मल ग्राम’ पुरस्कार मिळविला आहे; पण प्रशासनाने गावच्या प्रश्नांकडे मात्र डोळेझाक केली़ धोकादायक दगड प्रशासनाच्या निदर्शनास आणून देखील फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम प्रशासनाकडून होत होते़
‘लोकमत’ने या गंभीर प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले़ त्यानंतर, पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळाली़ गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, गावकऱ्यांनी सतत पाठपुरावा व समन्वयाने तोडगा काढत गावालगतची जमीन बिनशर्त पुनर्वसनासाठी देण्याची तयारी दर्शवली आहे़
पाटणचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसन प्रक्रियेत सहभाग घेतला आहे़ जिमणवाडीतील ४६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़
आणखी आठ कुटुंबांचे वाढीव प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरू आहे़ (वार्ताहर)
ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण
जिमणवाडी गावाच्या समस्या व या गावावर ओढवू पाहणारे संकट, याबाबत वेळोवेळी ‘लोकमत’ने आवाज उठविला़ गावाच्या डोक्यावर तीन महाकाय दगड कोसळण्याच्या स्थितीत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचेही ‘लोकमत’ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले़ त्यामुळे प्रशासनाने तातडीने हालचाली करून या गावाच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार केला़ तसेच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्याला मंजुरीही घेतली़ ‘लोकमत’च्या या भूमिकेमुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त केले जात आहे़
आम्ही वेळोवेळी गावात जाऊन सूचना देत आहोत़ तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली पुनर्वसन प्रक्रिया सुरू झालेली
आहे. निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर तयार झालेले अहवाल पुढील कारवाईसाठी पाठवण्यात येतील़
- एऩ डी़ पाटील, तलाठी