महाआवास अभियान: सातारा जिल्ह्यातील जिंती अन् शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबईत गौरव
By नितीन काळेल | Published: November 23, 2023 06:59 PM2023-11-23T18:59:56+5:302023-11-23T19:02:03+5:30
सातारा जिल्हा परिषदेचा पुन्हा डंका
सातारा : महाआवास अभियानात २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पाटण तालुक्यातील जिंती आणि साताऱ्यातील शेंद्रे ग्रामपंचायतीचा मुंबई येथे गौरव करण्यात आला. यामुळे सातारा जिल्हा परिषदेचा डंका पुन्हा एकदा वाजला आहे.
शासनाच्या वतीने महाआवास अभियान राबविण्यात येते. यामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांचा गौरव केला जातो. २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये सातारा जिल्ह्याने दुहेरी यश मिळविले आहे. राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीत पाटण तालुक्यातील जिंती गावाने प्रथम क्रमांक मिळविला. या ग्रामपंचायतीने ७५ गुण प्राप्त केले आहेत. तर या आवास योजनेतच राज्यातील सर्वोत्कृष्ट गृहसंकुलात सातारा तालुक्यातील शेंद्रे ग्रामपंचायतीने तृतिय क्रमांक प्राप्त केला.
मुंबईतील कार्यक्रमात जिंती आणि शेंद्रे ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा परिषदेतील ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, कोल्हापूरच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, विस्तार अधिकारी जयवंत ढाणे यांच्यासह जिंती आणि शेंद्रे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, महाआवास अभियानातील या यशाचे तसेच जिंती आणि शेंद्रे ग्रामपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामपंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी काैतुक केले.