पोवई नाका, राजवाडा बनू पाहतायत रोजगार केंद्रे
By admin | Published: July 29, 2015 09:38 PM2015-07-29T21:38:52+5:302015-07-29T21:38:52+5:30
मजुरांचा अड्डा : दररोज सकाळी रोजंदारीच्या शोधात असंख्य कामगार जोडप्यांची हजेरी
सातारा : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी कोणावर कधी काय करायची वेळ येईल, याचा नेम नाही. काम मिळेल की नाही, याची चिंता अनेकदा असते; मात्र सातारा याला अपवाद ठरत आहे. सातारा शहरातील पोवई नाका, राजवाडा, भूविकास बँक ही ठिकाणे रोजगार केंद्र बनू पाहत आहेत. दररोज सकाळी असंख्य मजूर जेवणाचा डबा, साधनं घेऊन या ठिकाणी जमत असतात.
कामधंदा नाही, नोकरीच मिळत नाही म्हणून असंख्य तरुण हातावर हात ठेवून दिवसभर घरात झोपून किंवा दूरचित्रवाणी संचासमोर बसून दिवस घालवतात. कोणी ओळखीचं भेटलंच तर काम मिळत नसल्याचा राग आळवत असतात. याच्याच विरोधी चित्र काही कष्टकरी लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.
रस्त्याचे खोदकाम, गटारी, इमारती बांधणे, पाडणे, माती उचलणे, अशी कष्टाची कामे करण्यास महाराष्ट्रीयन तरुण पुढे येत नाही. सातारी तरुणाची अवस्था काही वेगळी नाही. तळपत्या उन्हात रस्त्यावर कष्टाचं काम कोणी करायचा, हा प्रश्न त्यांना पडत असावा.
मराठी तरुणांच्या या स्वभावामुळे अशी कष्टाची कामे करण्याची जबाबदारी साहजिक कर्नाटकातील तरुणांवर येऊन पडत आहे. विजापूर, गुलबर्गा, बेळगाव, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक सीमेवरील लोकं रोजगाराच्या शोधात सातारा जिल्ह्यात आले आहेत. सुरुवातील कारागिराच्या हाताखाली राबून या तरुणांनी कला अवगत केली आहे. आता त्यातील काही तरुण बांधकामाचे ठेके घेत आहेत. अन् त्यांच्या कामाच्या ठिकाणीही तेथीलच तरुण काम करत आहेत.
रोजंदारीवरील कामगारांचे काम ठरलेले नसते. त्यामुळे कामाच्या शोधात ही मंडळी दररोज पहाटे सहा वाजताच उठून दोन वेळचा डबा करून पोवई नाका किंवा राजवाडा परिसरात येत असतात. यातील बहुतांश लोकंही पती-पत्नी आणि आख्खं संसारच बरोबर घेऊन येतात.
या ठिकाणी गावाकडच्या लोकांची भेट होते. गावाकडे कोणी जाऊन आला असल्यास हालहवा कळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोठे काम उपलब्ध आहे. याचीही माहिती मिळते. सर्व कारागीर, ठेकेदार तेथे येतात. कामाच्या स्वरूपानुसार कामगार निवडले जाते. त्यांना काम सांगितले जाते. (प्रतिनिधी)
बिगारी ते कुशल कारागीर
बिगारी ते कुशल कारागीर मिळण्याचे पोवई नाका, राजवाडा, भू-विकास बँक परिसर हमखास केंद्रे आहेत. एखाद्या ठेकेदाराने इमारत बांधण्याचा ठेका घेतला असल्यास ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळी कला असलेल्या मजुरांची गरज भासत असते. पाया खोदण्यासाठी कष्टाळू कारागिर हवे असतात. पाया भरण्यासाठी महिला असतील तरी चालतं, भिंत उभारणे, सेंट्रिंग, गिलावा, रंगकाम, फरशी गुळगुळीत करणे ही कामे वेगवेगळे कारागीर करत असतात.
कष्टाचं काम करावं तर...
कसलंही कठीण पाषाणात इमारतीचा पाया घ्यायचा असो, वा चाळीस फुटी इमारतीला रंगकाम करायचे. अनेक कामांचा ठेका महाराष्ट्रीय माणसं घेतात; पण कामगार म्हणून कर्नाटकातील मजुरांना प्राधान्य देतात. त्याचं कारणही ही ते बिनधास्त सांगतात. आपल्या माणसांना चिकाटीनं काम करण्याची माहिती नाही. चार तास काम केल्यावर जेवायला सुटी घेतील, त्यानंतर दोन तास केल्यावर चहाला म्हणून जातील ते दोन तास येणारच नाही. त्यापेक्षा कर्नाटकातील महिला मजूरही भरपूर काम करतात, असा त्यांचा अनुभव आहे.
ही आहेत यांची आयुधं४प्रत्येक उद्योग-व्यवसायाची काही साधनं, साहित्य हे आयुधं असतात. या साधनांशिवाय काम करणंच शक्य नसतं. त्याप्रमाणे या मजुरांचं ही आहे. कोणत्या कामात ते पारंगत आहेत. ती साधने घेऊनच ते येत असतात. यामध्ये टिकाव, फावडं, पहार, पाटी, घमेलं ही प्राथमिक साधनं झाली. त्याचप्रमाणे गवंडी काम करणे, रंगकाम करणारे, फरशीला पॉलीश करणारे त्यांची वेगवेगळी साधनं असतात, ती घेऊन ते येत असतात.