गावाच्या विकासासाठी नोकरदार सरसावले
By admin | Published: November 14, 2016 09:30 PM2016-11-14T21:30:00+5:302016-11-15T01:01:51+5:30
युवा मंचची स्थापना : कोपर्डे हवेलीत विविध उपक्रमांना प्रारंभ- गूड न्यूज
कोपर्डे हवेली : परगावी नोकरीसाठी असणाऱ्या युवकांनी सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी कोपर्डे हवेली येथे ‘युवा मंच’ची स्थापना केली आहे. येथील युवक नोकरीसाठी विविध ठिकाणी आहेत. मात्र, आपण या मातीचे देणे लागतो याची जाणीव होऊन गावात सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबर गावाच्या विकासासाठी ‘युवा मंच’ची स्थापना करण्यात आली आहे.
कोपर्डे हवेली गावातील तरुण नोकरीनिमित्त संपूर्ण राज्यासह देशातील इतर ठिकाणी कार्यरत आहेत. दिवाळी, यात्रा यावेळी ते गावी येत असतात. त्यावेळी त्यांच्यात चर्चा होऊन गावात सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरले. त्यातून त्यांनी ‘कोपर्डे हवेली युवा मंच’ची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी नियमावली तयार केली.
राजकारण विरहित काम करणे, कोणत्याही पदाची निर्मिती न करणे, बैठकीवेळी खुर्चीवर छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवून चर्चेला सुरुवात करणे तसेच सामाजिक उपक्रम राबवताना स्वच्छतेला जास्त महत्त्व देणे, तरुणांना नोकरीसंदर्भात मार्गदर्शन करणे, गाव प्लास्टिकमुक्त करणे, नोकरीसाठी पुण्यामध्ये तरुण आले तर नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत करणे, विधायक काम करण्यासाठी ग्रामपंचायतीला प्रवृत्त करणे तसेच राष्ट्रीय कार्यक्रमावेळी मदत करणे, लष्कराविषयी प्रेम जागृत करणे, गावात स्वच्छता राहण्यासाठी दररोज घंटागाडी फिरवण्यासाठी ग्रामपंचायतीला प्रवृत्त करणे, लहान मुलांसाठी उपक्रम राबवणे आदी कामे युवा मंच करणार आहे. त्यामध्ये प्लास्टिक टाळण्यासाठी
प्रबोधनात्मक डिजिटल बोर्ड लावण्यात आले आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून चार ठिकाणी नोकरीसंदर्भातील माहिती पुरविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही जबाबदारी ग्रामपंचायतीसह इतर संस्थांना देण्यात आली आहे. इतर खर्चासाठी मंचच्या सभासदांच्यावर मासिक वर्गणी ठरवण्यात आली आहे. जे सभासद नोकरीत कायम आहेत तेच वर्गणी देणार आहेत.
सध्या इतर ठिकाणच्या तुलनेत पुण्यामध्ये असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या युवा मंचमध्ये दोनशेच्यावर युवक सामील झाले आहेत.
अजूनही युवक सहभागी होण्याची चिन्हे आहेत. ‘गावच्या विकासासाठी स्वत: एक पाऊल उचलूया पुढे’ हे या मंचचे ब्रीद वाक्य आहे. (वार्ताहर)