टीईटी पास नसलेल्या जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:25 AM2021-06-30T04:25:23+5:302021-06-30T04:25:23+5:30
सातारा : टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, यावर औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या ...
सातारा : टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाच सेवेत राहता येईल, यावर औरंगाबाद खंडपीठाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शेकडो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमधील बहुतांश शिक्षक टीईटी उत्तीर्ण न झालेलेच आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांसमोरही टीईटी उत्तीर्णतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शासनाने शिक्षक म्हणून रुजू होणाऱ्यांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अथवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. २०१९ नंतर सेवेत रुजू होणाऱ्या शिक्षकांना डिसेंबर २०१९ पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, सेवेतील अनेक शिक्षकांनी ही परीक्षा दिली नाही किंवा परीक्षा देऊनही ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. अशा शिक्षकांच्या सेवा थांबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून शिक्षकांची सेवा थांबविण्याला विरोध होत असून, अशा शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी आणखी संधी उपलब्ध करून देण्याची मागणीही होत आहे.
चौकट
शिक्षक संघटनांचा विरोध
अपात्र शिक्षकांना २०१९ नंतर सेवेतून काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या परीक्षेत काही शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत. अशा पास शिक्षकांना सेवेत कायम राहण्यासाठी सवलत मिळायला हवी. त्याचप्रमाणे शासनाची भूमिका वारंवार बदलत असल्याने शिक्षकांना फटका बसला आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण शिक्षकांना संधी वाढवून द्यावी.
- प्रवीण घाडगे, उपाध्यक्ष, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ
संस्थाचालकांनी नियम डावलून काही शिक्षकांना रुजू करून घेत त्यांना मान्यता मिळविल्याने, असे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, सध्या अनेक शिक्षकांच्या नोकरीवर गदा येणार असल्याने अशा अपात्र ठरणाऱ्या शिक्षकांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान एक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून, त्यासाठी शासनाने मध्यस्थी करून पर्याय काढावा.
- शाबिरा मुल्ला, सल्लागार, जिल्हा प्राथमिक संघ, महिला आघाडी
टीईटी पात्रतेच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक टीईटी उत्तीर्ण आहेत. यात अपात्र शिक्षकांचा समावेश नाही तर अनुदानित शाळांमध्येही शिक्षक टीईटी पात्रताधारक नाही. विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित शाळांमधील अनेक शिक्षक पात्रताधारक नाहीत. याविषयी शिक्षण विभागाकडेही कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
कोट :
शिक्षक म्हणतात...
महाराष्ट्र शासनाने टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना प्रशिक्षण देऊन पुढील काळात टीईटी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तीन संधी द्याव्यात, अशी सर्वच टीईटी पास न झालेल्या शिक्षकांची अपेक्षा आहे, अन्यथा सर्वोच्च उच्च न्यायालयाचा पर्याय शिक्षकांसाठी खुला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने टीईटी उत्तीर्ण शिक्षकांविरोधात निकाल दिला असला तरी संबंधित याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाणं अपरिहार्य आहे.
- मिलन मुळे, शिक्षिका, जावळी
संस्थांनी अपात्र असताना रुजू केले. शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिली, आता मान्यता आली. त्यावेळी पात्रता विचारण्यात आली नाही. संधीची गणना करताना चुका झाल्या आहेत. पुरेशी संधी उत्तीर्ण होण्याची मिळाली नाही. काही पास झाले आहेत, संधी वाढवून मिळाव्यात. अनुभव लक्षात घेऊन प्रशिक्षण देऊन सवलत द्यावी, अन्यथा संधी वाढवून द्यावी. २०२० पास मुदतीबाहेर असल्याने किमान त्यांचा तरी विचार व्हावा.
- अनिल जायकर, सातारा
पॉर्इंटर :
टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षक :
अनुदानित शाळांतील शिक्षक :
विनाअनुदानित शाळांतील शिक्षक :
कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक :
एकूण शिक्षक :
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक :
अनुदानित शाळांतील शिक्षक :
विनाअनुदानित शाळांतील शिक्षक :
कायम विनाअनुदानित शाळांतील शिक्षक :