पालिका शाळांमध्येही आता ‘जॉनी जॉनी यस पप्पा’चे सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:46 PM2019-07-21T23:46:01+5:302019-07-21T23:46:07+5:30
सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा खालावत चालला असताना साताऱ्यात ...
सचिन काकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : इंग्रजी माध्यमिक शाळांच्या तुलनेत पालिका शाळांचा दर्जा खालावत चालला असताना साताऱ्यात मात्र वेगळेच चित्र पाहावयास मिळत आहे. अठरापैकी दोन शाळांमध्ये प्रथमच प्ले ग्रुप तर पंधरा शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे मराठी माध्यमिक शाळांमध्येही आता ‘जॉनी जॉनी यस पप्पा’चे सूर घुमू लागले आहेत.
शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढत चालली आहे, त्यामुळे पालिका व जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शासनाकडून राज्यातील अनेक शाळा बंदही करण्यात आल्या. पालकांचाही मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याकडे अधिक कल आहे.
या सर्व परिस्थितीचा आढावा घेत सातारा पालिकेने पालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ज्ञानवर्धिनी विद्यामंदिर शाळा क्रमांक दोन व सदर बझार येथील उर्दू शाळा क्रमांक बारा येथे प्रथमच प्ले ग्रुप सुरू करण्यात आले आहे. ज्ञानवर्धिनी विद्यामंदिरात ३० तर उर्दू शाळेत ४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या व्यतिरिक्त अठरा शाळांपैकी पंधरा शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यात आले असून, प्रत्येक शाळेसाठी एका अशा पंधरा शिक्षकांची नियुक्तीही केली आहे. ही सर्व जबाबदारी महिला शिक्षकांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.
पालिकेच्या शिक्षण मंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे पालकांचाही पालिका शाळांकडे बघण्याचा कल आता बदलत चालला आहे. इंग्रजी माध्यमिक शाळांप्रमाणेच विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे प्रयत्न शिक्षकांकडून केले जात आहे.
डिजिटल क्लासरूमची गरज
पालिकेच्या अठरापैकी केवळ सहा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उर्वरित शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. काही शाळांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. खिडक्या, कौले, पत्रे तुटले असून, पावसाळ्यात या शाळांमध्ये पावसाचे पाणी गळते. पालिका प्रशासनाने शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करताना या समस्यांची प्राधान्याने सोडवणूक करावी, अशी मागणी केली जात आहे.
ज्ञानवर्धिनी विद्या मंदिराची पटसंख्या दुप्पट
पालिका शाळेच्या इतिहासात प्रथमच ‘प्ले ग्रुप’चा प्रयोग राबविण्यात आल्याने पटसंख्येही वाढ झाली आहे. ज्ञानवर्धिनी विद्यामंदिराची पहिली ते चौथी पर्यंतची पटसंख्या ४० वरून आता ८४ वर पोहचली आहे. पुढील वर्षी ती दुप्पट करण्याचा शिक्षकांचा मनोदय आहे.