माझी वसुंधरा अभियानात सहभागी व्हावे : अमोल पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:16+5:302021-03-04T05:12:16+5:30
कुडाळ : माझी वसुंधरा अभियानअंतर्गत मेढा नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन ...
कुडाळ : माझी वसुंधरा अभियानअंतर्गत मेढा नगरपंचायतीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे, आवाहन मुख्याधिकारी अमोल पवार यांनी केले. मेढा नगरपंचायतीमार्फत माझी वसुंधरा अभियानाविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संतोष कदम, मित्र मेळा फाऊंडेशनचे प्रवीण पवार, विश्वनाथ डिगे, शहर समन्वयक सचिन घाटुळे आदी उपस्थित होते.
या अभियानामध्ये पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, वायू या निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्ग पूरक जीवन पद्धती अवलंबण्यासाठी विविध कामे करण्यात येत आहेत. तसेच शहरातील वायु गुणवत्ता नियंत्रणात राहण्यासाठी विविध उपाय केले जाणार आहेत. याकरिता अभियानांतर्गत वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, हवेच्या गुणवत्ता देखरेखीसाठी शहरात प्रणाली बसवणे, सायकल रॅली काढून जनजागृती करणे, शहरातील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, शहरात हरित आच्छादन वाढवणे आदी कामे होणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
(चौकट)
विद्यार्थ्यांची हरित शपथ
वसुंधरेचे रक्षण करून माझ्यापासून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. तसेच माझ्याकडून पर्यावरण पूरक गोष्टींना हातभार लावला जाईल. कमीत कमी पाच झाडे लावून त्यांचे योग्य पद्धतीने संरक्षण करून जोपासना करण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असा निर्धार करून पर्यावरण संवर्धनाकरिता जावली करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हरित शपथ घेतली.
फोटो : ०२ कुडाळ फोटो
मेढा येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत जावळी करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी हरित शपथ घेतली.