टॅक्सी संपात अख्खे महाबळेश्वर सामील
By admin | Published: February 15, 2016 10:45 PM2016-02-15T22:45:39+5:302016-02-16T00:02:39+5:30
शंभर टक्के बंद : ‘रेंट ए मोटारसायकल’ चालू देणार नाही; आश्वासनानंतर टॅक्सीचालकांचे आंदोलन मागे
महाबळेश्वर : एका धनिकासाठी शहरातील गोरगरीबांच्या उदरनिवार्हाचे प्रमुख साधन असलेला टॅक्सी व्यवसाय उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न मी उधळून लावू. कोणत्याही परिस्थितीत रेंट ए मोटारसायकल चालू देणार नाही. स्थानिक लोकांचा रोजगारावर प्रथम हक्क आहे, तो हक्क कोणी हिरावून घेत असेल तर याचे परिणाम गंभीर होतील, असा सज्जड इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला.
दरम्यान, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांनी टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन विभाग सातारा यांची संयुक्त बैठक होईपर्यंत रेंट ए मोटारसायकल सुरू करण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
परिवहन विभागाने दिलेल्या रेंट ए मोटारसायकल परवान्याला विरोध करण्यासाठी सोमवारी टॅक्सी संघटनेने पुकारलेल्या महाबळेश्वर बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. टॅक्सी संघटनेने शहरातून खा. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. राज्य शासनाने पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहरात रेंट ए मोटार सायकल व्यवसाय करण्यासाठी एका खासगी संस्थेला परवाना दिला आहे. टॅक्सी संघटनेचा विरोध डावलून रेंट ए मोटारसायकल या व्यवसायाचे उद्घाटन करण्याचा घाट घातला आहे. याला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
टॅक्सी स्थानकावरील दत्त मंदिरापासून मूक मोर्चाला प्रारंभ झाला. खा उदयनराजे भोसले यांच्यासह नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, जि. प. सदस्य बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, उपसभापती संजय गायकवाड, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, नगरसेवक संतोष शिंदे, संदीप साळुंखे, प्रकाश साळुंखे, लीलाताई मानकुंबरे, अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब कोढाळकर, शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख राजेश कुंभारदरे, अध्यक्ष दत्तात्रय वाडकर, समन्वय समितीचे अध्यक्ष प्रवीण भिलारे, विकास शिंदे, सुनील काटकर, सज्जाद वारूणकर, अतुल सलागरे, अफजल सुतार, सुभाष कारंडे, समीर सुतार, विशाल तोष्णीवाल आदी मान्यवर उपस्थित होते. हा मोर्चा बाजारपेठ मार्गे बसस्थानकावर आला. तेथे उदयनराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
धरणे अन् ठिय्या
खासदार उदयनराजे यांच्यासह सर्वजण बसस्थानक परिसरात आले व तेथे रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर पर्यटन विकास महामडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची कल्पना अधिकाऱ्यांना नव्हती. त्यांनी या आंदोलनाची माहिती वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक वैशाली चव्हाण यांना कळविली. त्यांनी रेंट ए मोटारसायकल या व्यवसायाचा उद्या होणारा उद्घाटन सोहळा रद्द् करण्यात आल्याचे तसेच टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन विभाग सातारा यांची संयुक्त बैठक होईपर्यंत रेंट ए मोटारसायकल सुरू करण्यात येणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष अनंत पारठे, सचिव चंद्रकांत बावळेकर, पाचगणी टॅक्सी संघटनेचे सुनील पार्टे, उपाध्यक्ष चंद्रकांत कासुर्डे, महाबळेश्वर टुरिस्ट टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संदीप अक्षंतल व पाचगणीचे अध्यक्ष चंद्रकांत मर्ढेकर, सुधाकर हिरवे, शंकर ढेबे, शंकर जाधव, बाळू कदम, दत्तात्रय जाधव, विजय डांगे, दादा मानकर, जावेद वारूणकर आदी उपस्थित होते.
वाहतुकीची कोंडी, पर्यटकांची गैरसोय
या आंदोलनामुळे शहर व परिसरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. बंदमुळे शहरातील पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. अनेक पर्यटकांनी पाचगणी गाठली व आपली सोय केली.