जोडरस्ते देताहेत अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:26 AM2021-07-10T04:26:54+5:302021-07-10T04:26:54+5:30
कऱ्हाडपासून उंब्रजपर्यंत महामार्गाच्या उपमार्गालगत दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर हॉटेल, ढाबे व लॉज आहेत. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत आहे. वारुंजी ...
कऱ्हाडपासून उंब्रजपर्यंत महामार्गाच्या उपमार्गालगत दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर हॉटेल, ढाबे व लॉज आहेत. दिवसेंदिवस त्यामध्ये वाढच होत आहे. वारुंजी फाटा, गोटे, मुंढे, खोडशी, वनवासमाची, बेलवडे हवेली, तळबीड, तासवडे, वराडे, शिवडे, कोर्टी आदी ठिकाणच्या हॉटेलच्या संख्येत गत काही वर्षात भर पडली आहे. संबंधित व्यावसायिक हा व्यवसाय थाटत असताना प्रशासनाच्या नियमांना बगल देत आहेत.
हॉटेलसह ढाबा सुरू करताना पार्किंगसाठी पुरेशी जागा ते सोडत नाहीत. उलट सेवा रस्त्यावरच नियमबाह्यरीत्या वाहने पार्क करतात. अनेक ठिकाणी महामार्ग व सेवा रस्ता यांमध्ये व्यावसायिकांनी नियमबाह्यरीत्या जोडरस्ते तयार केले असून ते अपघातास निमंत्रण देत आहेत. हॉटेल, ढाब्याकडे जाण्यासाठी एखादा वाहनचालक अचानक या जोडरस्त्यानजीक वाहनाचा वेग कमी करतो. वळण घेतो. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनाच्या चालकाचे वाहनावर नियंत्रण होत नाही. परिणामी, अपघात होतात.
गोटे, मुंढे, खोडशी, बेलवडे हवेली, तासवडे, वराडे, शिवडे, भोसलेवाडी, कोर्टी आदी हद्दीतील काही व्यावसायिक स्वत:च्या फायद्यासाठी महामार्गाच्या सेवा रस्त्यावरच वाहने पार्किंग करताना दिसतात. त्यामुळे अन्य प्रवासांना आपला जीव धोक्यात घालून तेथून प्रवास करावा लागतो. अनेकदा संबंधित हॉटेल, ढाबे व लॉज व्यावसायिकांना अन्य वाहनधारकांनी, ग्रामस्थांनी जाब विचारला असता संबंधितांना अरेरावीची भाषा वापरली जाते.
- चौकट
हॉटेल तसेच ढाब्यासमोरील नियमबाह्य पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. दिवसा तसेच रात्रीही अनेक वाहने उपमार्गावर तासन्तास उभी असतात. या वाहनांजवळ सुरक्षात्मक कसलीच उपाययोजना नसते. त्यामुळे उपमार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनांना अडथळा होण्याबरोबरच अपघाताची शक्यता निर्माण होते.
फोटो : ०९केआरडी०६
कॅप्शन : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नियमबाह्यरीत्या जोडरस्ते तयार करण्यात आले असून हे रस्ते अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत.