जावळीचे राजकारण वेगळ्याच वळणावर !

By admin | Published: January 1, 2017 10:47 PM2017-01-01T22:47:53+5:302017-01-01T22:47:53+5:30

विविध चर्चांना उधाण : सध्यातरी कोण जिंकणार हा प्रश्न अनुत्तरीतच ; निवडणुकीपूर्वीच घडामोडींना आला वेग

Jolie politics at a different turn! | जावळीचे राजकारण वेगळ्याच वळणावर !

जावळीचे राजकारण वेगळ्याच वळणावर !

Next

आनंद गाडगीळ ल्ल मेढा
जावळी तालुक्यात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस, कणखर नेता नसला तरीही जनतेच्या पाठिंब्यावर उभारी धरू पाहणारी शिवसेना, भाजपाची धिमी पण आश्वासक सुरू असलेली वाटचाल, नावापुरती असणारी राष्ट्रीय काँग्रेस व मनसे, मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने दिलेला त्रिशंकू कौल अन् नुकत्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित भणंग व महिगाव येथील घडलेल्या घटना या पार्श्वभूमीवर फेबु्रवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.
दरम्यान, असे असले तरीही जावळीचे राजकारण मात्र नक्कीच वेगळ्या वळणावर चालले असल्याची मतदारांमध्ये चर्चा आहे.
जावळीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांना
मानणारे दोन गट असले तरीही तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्वच सहकारी संस्था, स्वायत्त संस्थेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.
जावळीत शशिकांत शिंदे आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यावेळी शिवसेनेच्या ताब्यात असलेली पंचायत समिती राष्ट्रवादीकडे खेचून घेतानाच तालुक्यातील एकमेव विरोधी असलेल्या सेनेचा कणा मोडला हे कटू सत्य आहे.
माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे या सेनेच्या नेत्यांनी राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्यानात आपल्या तलवारी म्यान केल्या. सेनेला नेतृत्वच न राहिल्याने राष्ट्रवादी निर्विवाद प्रबळ झाली. आजअखेर सेना कणखर नेतृत्वाविना असली तरीही जावळीच्या प्रत्येक गावाची राजधानी मुंबईशी नाळ जोडली असल्याने तालुक्यातील प्रत्येक गावात सेना जिवंत आहे. हे देखील तितकेच खरे आहे.
त्यातच १९९० ते ९५ या काळात माजी आमदार सदाशिव सपकाळ,
वसंतराव मानकुमरे, प्रकाश भोसले, तुकाराम धनवडे, रामभाऊ शेलार आदींनी तालुक्यातील प्रत्येक
गावात सेनेचे निर्माण केलेले
अस्तित्व राष्ट्रवादीच्या झंझावतात आजही थोड्या फार प्रमाणात टिकून आहे.
राष्ट्रवादीच्या निर्विवाद सत्तेची घोडदौड सुरू असतानाच जावळी मतदार संघ रद्द झाला अन् शशिकांत शिंदे यांच्या रूपाने असलेले जावळीचे स्थानिक नेतृत्व बदलले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नेतृत्व जावळीकरांनी स्वीकारून राष्ट्रवादीचा प्रवास सुरू आहे. मात्र, रद्द झालेला मतदारसंघ अन् बदललेल्या नेतृत्वानंतर मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये गटातटाचे नेतृत्व मानायचे की पक्षाचे अशी संभ्रमावस्था सुरू झाली. हळूहळू ती प्रबळ
होत असल्याचे सध्या चित्र
आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील जावळीकडे विशेष लक्ष देऊन गटातटाच्या कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आमदार शशिकांत शिंदे यांनीही गटातटाला खतपाणी घातले नाही. तरीही जावळीत राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्याचे व या गटांमध्ये ठिणगी पडू लागल्याचे चित्र नुकत्याच महिगाव येथील सुहास गिरींच्या घरावरील झालेल्या हल्ल्याने दिसू लागले आहे.
जावळी पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण नसताना देखील सुहास गिरी यांची सभापतिपदी लागलेली वर्णी, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती व विद्यमान सदस्य अमित कदम आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात मध्यंतरीच्या काळात झालेला बेबनाव, विधानसभा निवडणुकीत आमदार भोसले यांच्या विरोधात मेढ्यात झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून शिवेंद्रसिंहराजेंनी काही काळ धरलेला रुसवा, मेढा नगरपंचायतीचा श्रेयवाद, या साऱ्या पार्श्वभूमीवर मेढा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीत वाढलेली बंडखोरी अन् सत्तेची त्रिशंकू
अवस्था. या साऱ्या घटनांपाठोपाठ नुकतीच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दीपक पवार यांच्या कार्यकर्त्याला दिलेली थप्पड अन् त्याचबरोबर सुहास गिरी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी सुहास गिरींची कमराबंद चर्चा झाली. या साऱ्या घटना जावळीतील राष्ट्रवादीत सारे काही अलबेल नसल्याचेच
सांगतात.
इकडे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच कणखर नेतृत्व नसलेली सेना, मेढा नगरपंचायतीच्या निकालानंतर काही शिवसैनिकांनी ‘जय महाराष्ट्र’ करीत केलेल्या भाजपा प्रवेशाने सेनेची कमी झालेली ताकद पाहता जनतेच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सेना किती ताकद दाखवते हे देखील महत्त्वाचे आहे.

सेना-भाजपाची भूमिका गुलदस्त्यात...
एकंदरीत राष्ट्रवादीतील धुसफूस, प्रबळ नसलेली शिवसेना व जावळीकरांच्यात म्हणावी अशी न मिसळलेली भाजपा या साऱ्याच पक्षांची स्थिती पाहता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. त्यातच राष्ट्रवादीत असलेली इच्छुकांची भाऊगर्दी व सेना भाजपाने उमेदवारांच्याबाबत गुलदस्त्यातच ठेवलेली भूमिका पाहता जावळीचे राजकारण वेगळ्याच वळणावर असल्याचे जाणवते. राजकारणात कायम मैत्री अन् कायम शत्रूत्व कोणाचेच नसते, असे म्हणतात. त्यामुळे या निवडणुकीच्या आखाड्यात कोण-कोण उतरणार? अन् कोण जिंकणार यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार, हे मात्र नक्कीच.

Web Title: Jolie politics at a different turn!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.