पत्रकार हा समाजाचा आरसा : श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:03 PM2018-06-24T23:03:50+5:302018-06-24T23:04:21+5:30
पाटण : ‘पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो. खरा पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो. पत्रकारिता टिकली पाहिजे. राज्यातील पत्रकारांचा हा मेळावा म्हणजे आमची आषाढी एकादशी आहे,’ असे प्रतिपादन सिक्कीमचे राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील यांनी केले.
पाटण येथे रविवार राज्यातील पत्रकार संघांच्या तालुकाध्यक्षांचा राज्यस्तरीय मेळावा व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मनसेचे राज्यसरचिटणीस संदीप देशपांडे, भाजपचे भरत पाटील, सारंग पाटील, परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘पत्रकार समाजाचा डोळा असतो. तो चांगल्या गोष्टींना प्रसिद्धी देतो. त्याचबरोबर वाईट गोष्टीही समाजासमोर मांडतो. मनोरंजनाबरोबरच दैनिकातून शिक्षण देण्याचे काम केले जाते. वर्तमानातील माहिती आणि भविष्याचे संकेत देण्याचे काम वर्तमानपत्रे करत आहेत.’
जयंत पाटील म्हणाले, ‘पत्रकारांना आपल्या मागण्यांसाठी अनेक कष्ट घ्यावे लागत आहेत, ही खेदाची बाब आहे. राज्य शासन करत असलेल्या कामातील त्रुटींची माहिती वर्तमानपत्रातून कळते. पत्रकारांवर होत असलेले हल्ले ही खेदाची बाब आहे. आजच्या पत्रकाराला विविध दहशतीतून जावे लागत आहे. ’
आठ संघांना आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून गौरविण्यात आले. दुपारच्या सत्रात ‘आमचे प्रश्न आमच्या व्यथा’ यातून ग्रामीण पत्रकांराना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबाबत संवाद साधण्यात आला. आमदार शंभूराज देसाई, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर आदींनी मनोगत व्यक्त केले. शंकर मोहिते यांनी स्वागत केले. शरद काटकर यांनी प्रास्ताविक केले. शरद पाबळे यांनी आभार मानले