भक्तिगीतातून संतपरंपरेचा सुरेल प्रवास..

By admin | Published: March 23, 2015 10:38 PM2015-03-23T22:38:42+5:302015-03-24T00:19:55+5:30

वेण्णाई भक्तिमंचचा कार्यक्रम : ज्योत्स्नाभाभींना भावपूर्ण श्रद्धांजली

The journey of devotion to devotion from devotion .. | भक्तिगीतातून संतपरंपरेचा सुरेल प्रवास..

भक्तिगीतातून संतपरंपरेचा सुरेल प्रवास..

Next

सातारा : महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात. संत परंपरा काय आहे. संतांनी काय आदर्श घालून दिले, याचे यथार्थ दर्शन सप्तक निर्मित वेण्णाई भक्तिमंचच्या कलाकारांनी घडविले. भक्तिगीत, भावगीतांतून त्यांनी संतपरंपरेचा सुरेल प्रवास समोर आणला. सुमारे तीन तास सुरू असणारा हा कार्यक्रम सातारच्या महिलांना भावून गेला. ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या ज्योत्स्नाभाभी दर्डा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सातारा येथील शाहू कला मंदिरमध्ये ‘आठवण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन किशोर माने, सिद्धी पवार, जयश्री शिंदे, स्वाती ओक यांच्या उपस्थितीत झाले. ‘लोकमत सखी मंच’ची स्थापना करणाऱ्या आदरणीय ज्योत्स्नाभाभी दर्डा यांची प्राणज्योत दोन वर्षांपूर्वी २३ मार्चला मालवली. त्यांच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सखी मंचने ‘आठवण’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ’ ही वंदना झाली. त्यानंतर सप्तक निर्मित वेण्णाई भक्तिमंचच्या कलाकारांनी संतपरंपरेचा सुरेल प्रवास घडविला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी आपल्याला संस्कार दिले आहेत. महाराष्ट्रात विविध सांप्रदाय असले तरी वारकरी सांप्रदाय हा महत्त्वपूर्ण आहे. दरवर्षी लाखो भाविक आळंदी-पंढरपूरची वारी करतात.
तसेच दर महिन्यालाही पंढरीच्या ओढीने जाणारे हजारो भाविक आहेत, असे सांगून त्यांनी ‘खेळ मांडियेला वाळवंटी दाटी, नाचती वैष्णव भाईरे...’ हे भक्तिगीत सादर केले. त्यानंतर ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ हे भक्तिगीत सादर केले.‘शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान,’ हे भक्तिगीत सादर झाले. त्यानंतर ‘संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत’, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी,’ ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे पुण्याची गणना कोण करी,’ दिगंबरा-दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,’ ‘काटा रुते कुणाला,’ ‘जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा,’ तसेच ‘ या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे,’ यासारखी भावगीतेही या कार्यक्रमात सादर करण्यात आली.
या कार्यक्रमाचे निवेदन सचिन सावंत यांनी केले. किरण भोसले, किशोर माने, किरण सावंत, संजय वर्णेकर यांनी गायन केले. हार्मोनियम किरण भोसले, सिंथेसायझर सोमनाथ गोरे, तबला हरी चव्हाण, ढोलकी वादन तुषार पवार, तालवाद्य अशोक पवार यांनी केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सखींनी भाभीजींच्या प्रतिमेला फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (प्रतिनिधी)

सखी मंचला १३ वर्षे पूर्ण...
ज्योत्स्नाभाभींच्या संकल्पनेतून साकारलेले ‘सखी मंच’ हे महिलांचे हक्काचं व्यासपीठ, आज त्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर झाला आहे. महिलांच्या जिव्हाळ्याचे असणारे ‘सखी मंच’ ज्योत्स्नाभाभींच्या अथक परिश्रमांचे, चिकाटीचे फळ आहे. सुरुवातीला लहान वाटणाऱ्या या अंकुराचे आज महाकाय वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सखी मंचने आपल्या यशस्वी कारकिर्दीची तेरा वर्षे पूर्ण केली आहेत.

Web Title: The journey of devotion to devotion from devotion ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.