संघर्ष यात्रा म्हणजे पन्नास वर्षांचे पाप
By admin | Published: April 23, 2017 10:42 PM2017-04-23T22:42:49+5:302017-04-23T22:42:49+5:30
सदाभाऊ खोत यांची टीका : विरोधकांच्या काळात आंदोलनावेळी शेतकऱ्यांना गोळ्या घालण्याचे काम
पाटण : ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी शासनाने गेल्या ५० वर्षांच्या सत्तेत शेतकऱ्यांसाठी कोणतीही गुंतवणूक केली नाही. नवीन तंत्रज्ञान आणले नाही. आता कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढत असून,त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा यायला लागला आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलने केली तेव्हा त्यांना गोळ्या घालण्याचे काम त्यांच्याच सरकारने केले. म्हणूनच आजची संघर्ष यात्रा म्हणजे ५० वर्षांचे पाप आहे,’ अशी परखड टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.
दौलतनगर, ता. पाटण येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराष्ट्र शासन, देसाई कारखाना यांच्या वतीने आयोजित दौलत कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री खोत म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी भाजीपाला नियमनमुक्ती विधेयक मंजूर करून घेतल्यानंतर राज्यातील शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात शंभर ठिकाणी शेतकऱ्यांचे बाजार सुरू झाले आहेत. ऐवढंच काय मंत्रालयात पायरीवर सुद्धा शेतकरी शेतीमाल विकू शकतात. जलयुक्त शिवार योजनेतून पाण्याचा थेंब न् थेंब साठविता आला पाहिजे. म्हणून ५२ कोटी रुपये उभे केले आहेत. नाबार्डच्या माध्यमातून ३ लाख हेक्टर जमीन ठिबकखाली आली पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
या कार्यक्रमास रविराज देसाई, अॅड. मिलिंद पाटील, अशोकराव पाटील, नारायण शिसोदे, जितेंद्र शिंदे, अॅड. डी. पी. जाधव, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, गटविकास अधिकारी के.एस. गौतम, कृषी अधिकारी
चांगदेव बागल आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
पृथ्वीराज चव्हाण लक्ष्य...
‘आमदार शंभूराज देसाई यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य केले. ७० हजार कोटी रुपये काँग्रेस सरकारने शेती व पाण्याच्या योजनांसाठी खर्च केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सांगतात. तर मग आज ०.२० टक्के जमीनसुद्धा इरिगेशनच्या माध्यमातून ओलिताखाली आलेली नाही असे सांगत टीका केली. भाजप-सेना युतीचे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱ्यांना कायमस्वरुपी कर्जमुक्त कसे करता येईल, याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस करत आहेत,’ असे आमदार शंभूराज देसाई म्हणाले.