..अन् दुभाजकामुळे वाचले अनेक जीव!
By admin | Published: December 23, 2016 11:05 PM2016-12-23T23:05:52+5:302016-12-23T23:05:52+5:30
शंभर फुटावर मंडई : एसटी चालकाचे सुटले नियंत्रण
सातारा : पोवई नाका बसस्थानक रस्त्याच्याकडेला रोज सकाळी मंडई भरते. शुक्रवारी सकाळीही नेहमीप्रमाणे या रस्त्यावर नागरिक आणि व्यापाऱ्यांची धांदल सुरू असतानाच अचानक वडूज-ठाणे एसटीच्या चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाने प्रसंगावधान दाखवून दुभाजकावर बस धडकवली. त्यामुळे केवळ शंभर फुटावर मंडई खरेदीसाठी असलेल्या नागरिकांचे जीव वाचले. या अपघाताच्या निमित्ताने रस्त्यावर भरत असलेल्या मंडईतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
वडूज-ठाणे ही एसटी बस सकाळी पोवई नाक्यावरून बसस्थानकाकडे येत होती. एसटीने वळण घेतल्यानंतर आकार हॉटेलपासून पुढे रस्त्याच्याकडेला भाजी मंडई भरली होती. गाडीवरील आपले नियंत्रण सुटल्याची जाणीव चालकाला झाली. दुभाजकाला एसटी धडकवली नाही तर पुढे उतारावर भाजी विक्रीस बसलेल्या नागरिकांच्या जीवितास धोका संभविण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता चालकाने प्रसंगावधान
दाखवून एसटी दुभाजकाला धडकवली. एसटी जोरदार धडकल्याने आतील रघुनाथ नारायण जाधव (वय ५४ रा. गुरसाळे, ता. खटाव) यांच्यासह अन्य प्रवाशीही किरकोळ जखमी झाले.
एसटीतून खाली उतरल्यानंतर समोर असलेली नागरिकांची गर्दी पाहून प्रवाशांच्या काळाजाचा थरकाप उडाला. चालकाने ही एसटी दुभाजकाला धडकवली नसती तर या विचारानेच अनेक प्रवाशांच्या अंगावर अक्षरश: काटा आला. ड्रायव्हिंग सीटवरून चालक खाली उतरल्यानंतर काही नागरिकांनी चालकाला पाणी दिले. थोडावेळ खाली बसविले. त्यानंतर पोलिसांनी चालकाला थेट एसटी डेपोमध्ये नेले. नेमका काय प्रकार झाला, याची पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. एसटी महामंडळाने प्रवाशांना पर्यायी एसटी उपलब्ध करून दिली. (प्रतिनिधी)