CoronaVirus In Satara : फलटण, माणमध्ये जम्बो कोविड सेंटर : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 12:09 PM2021-05-29T12:09:30+5:302021-05-29T12:14:32+5:30

CoronaVirus In Satara : फलटण, माण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे. फलटण तालुक्यात तर एकाच दिवसात हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. संसर्ग वाढतो आहे, तसेच अत्यवस्थ रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याने उपाययोजना म्हणून फलटण आणि माण तालुक्यासाठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Jumbo Covid Center in Phaltan, Maan: Ajit Pawar | CoronaVirus In Satara : फलटण, माणमध्ये जम्बो कोविड सेंटर : अजित पवार

CoronaVirus In Satara : फलटण, माणमध्ये जम्बो कोविड सेंटर : अजित पवार

Next
ठळक मुद्देफलटण, माणमध्ये जम्बो कोविड सेंटर : अजित पवार संसर्ग रोखण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

सातारा : फलटण, माण तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे. फलटण तालुक्यात तर एकाच दिवसात हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. संसर्ग वाढतो आहे, तसेच अत्यवस्थ रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याने उपाययोजना म्हणून फलटण आणि माण तालुक्यासाठी स्वतंत्र जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन पवार यांनी साताऱ्यात आढावा बैठक घेतली त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची प्रमुख उपस्थिती होती.

अजित पवार म्हणाले, 'पी एम केअर मधून वेंटीलेटर मशीन मिळाले, त्यापैकी काही चालू स्थिती तर बहुतांश बंद आढळल्याने त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र सध्याच्या अटीतटीच्या घडीमध्ये हे व्हेंटीलेटर तपासून दुरुस्त करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.'

कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्या पद्धतीने प्रशासनानं काम केलं त्या पद्धतीने दुसऱ्या लाटेत झालं नाही. प्रशासनाची ही लाईन आता इथून पुढे खपवून घेतली जाणार नाही हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.

सातारा जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे आणि रुग्ण संख्येतही हा जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. फलटण, माण या तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची लाट आटोक्यात आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. शासनाने दिलेले नियम पाळावे लागतील. घराबाहेर विनाकारण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई त्यासोबतच आपत्ती निवारण कायद्यातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, कोरोनाची लाट सलग १४ महिने राहिल्याने प्रशासनावर मोठा ताण होता. त्यामुळे कदाचित दुसऱ्या लाटेमध्ये प्रशासन गाफील राहिले. आता हा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जे अधिकारी, कर्मचारी कामांमध्ये हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात गृह विलगीकरण पूर्ण बंद

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रभाव जाणवतो आहे. शहराच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागात संसर्ग वाढत असल्याने ग्रामीण भागामध्ये गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करून संस्थात्मक विलगीकरण करण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. पंधराव्या वित्त आयोगातील मधील कोरोना विलगीकरण कक्ष आणि त्यासाठी लागणारी सामग्री यासाठी वापरण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला देण्यात आले आहेत. टप्प्याटप्प्याने शहरात देखील याची अंमलबजावणी केली जाईल.

बीएएमएस डॉक्टरांना काढणार नाही

बी ए एम एस डॉक्टरांना तात्पुरत्या सेवेमध्ये घेतले आहे, त्यांची सेवा संपल्यानंतर देखील कोरोना महामारीच्या कामासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत, हॉस्पिटलची मदत घेतली जात आहे, त्याठिकाणी त्यांची सेवा वर्ग करण्यात येईल. राज्याच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने संबंधित डॉक्टरांना कामावरून काढून टाकले जाणार नाही. या डॉक्टरांना ४० हजारांपर्यंत पगार वाढ देण्यात येईल असेही पवार म्हणाले.

...हा तर मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार

राज्याला पीएम केअरमधून व्हेंटिलेटर मशीन्स मिळाले होते, त्यापैकी बहुतांश मशीन बंद स्थितीत आढळले. हे मशीन्स तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, बंद मशीन देणे म्हणजे मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असल्याची टीका पवार यांनी केली आहे.

Web Title: Jumbo Covid Center in Phaltan, Maan: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.