कऱ्हाडात होणार जम्बो कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:55+5:302021-06-11T04:26:55+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह ...
कऱ्हाड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शहरात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गुरूवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध शासकीय इमारतींना भेट देऊन पाहणी केली. लहान मुलांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटरसह आणखी सुमारे चारशे बेडची व्यवस्था शहरात करण्याचे नियोजन आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, पालिकेचे आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे, अभियंता ए. आर. पवार, मंडल अधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम यावेळी उपस्थित होते. शहरातील मुख्याधिकारी निवासस्थान, उपजिल्हा रुग्णालय, यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल, तहसील कार्यालयाची मार्केट यार्डमधील जुनी इमारत, दैत्यनिवारणीनजीक असलेले यशवंतराव चव्हाण सभागृह आदी ठिकाणी भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
शहरात लहान मुलांसह सुमारे चारशे बेडची शहरात व्यवस्था केली जाणार आहे. जम्बो कोविड सेंटरसाठी आवश्यक जागा उपलब्ध न झाल्यास शहरातील विविध भागात पालिकेच्या इमारती, हॉल, सभागृहांचा बेडसाठी वापर करण्यात येणार आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेऊन शहरातील कोरोना केअर सेंटर तसेच पालिकेच्या मालकीच्या काही इमारतींमध्ये बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पाहणी करण्यात आली.
- चौकट
ऑक्सिजन गॅस प्लांटची पाहणी
मुख्याधिकारी निवासात वीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली असून, याचठिकाणी आणखी काही बेडची व्यवस्था करता येऊ शकते का, या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयात सध्या पन्नास बेडची व्यवस्था असून, आणखी काही बेड वाढवता येतील का, त्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली. तसेच रुग्णालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन गॅस प्लांटची पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
फोटो : १० केआरडी ०५
कॅप्शन : कऱ्हाडला जम्बो कोविड सेंटरसाठी विविध इमारतींची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरूवारी पाहणी केली.