जूनमध्येच नवजा, महाबळेश्वरचा पाऊस एक हजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 03:16 PM2021-07-01T15:16:32+5:302021-07-01T15:17:46+5:30
Rain Satara : सातारा जिल्ह्यात पावसाने दडी मारली असलीतरी जूनमध्येच नवजा आणि महाबळेश्वरमधील पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर पावसाची उघडीप असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात ४२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
सातारा : जिल्ह्यात पावसाने दडी मारली असलीतरी जूनमध्येच नवजा आणि महाबळेश्वरमधील पावसाने एक हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. तर पावसाची उघडीप असल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. सध्या धरणात ४२.४७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
जिल्ह्यात मागील १५ दिवसांपूर्वी पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच पूर्व भागातही काही ठिकाणी चांगला पाऊस झालेला. या पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणांत चांगला पाणीसाठा झाला. कोयनासारख्या धरणात अवघ्या पाच दिवसांत १० टीएमसीवर पाणीसाठा वाढला होता. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामालाही सुरूवात केलेली. असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे.
गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा ५ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून ९२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला २२ तर यावर्षी आतापर्यंत १०८६ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत २८ तर जूनपासून १२४२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४२.४७ टीएमसी ऐवढा पाणीसाठा झाला होता. तर २४३१ क्यूसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग तीन दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच पूर्व भागात ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचबरोबर सूर्यदर्शनही होत आहे. पूर्व भागात पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणीची कामे रखडली आहेत.