कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मोफत मिळणार स्वसंरक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:45 AM2021-08-20T04:45:30+5:302021-08-20T04:45:30+5:30
सातारा : महाविद्यालयीन आयुष्यात होणाऱ्या छेडछाडीचे प्रकार लक्षात घेता कौशल विकास, पोलीस आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ...
सातारा : महाविद्यालयीन आयुष्यात होणाऱ्या छेडछाडीचे प्रकार लक्षात घेता कौशल विकास, पोलीस आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना मोफत स्वसंरक्षणाचे धडे ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थिनीला यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी व्यक्त केली.
सातारा जिल्हयातील कनिष्ठ महाविदयालयातील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची प्राचार्यांची ऑनलाईन बैठक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रभावती कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मुलीना आत्मनिर्भर बनविण्यासाठी स्वरक्षणाचे ऑनलाईन प्रशिक्षण पोलीस विभागामार्फत सातारा जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.
बैठकीसाठी शिक्षण विभाग माध्यमिकचे सहा.शिक्षण उपनिरीक्षक साईनाथ वाळेकर यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत पी.पी.टी द्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे यांनी संविधानिक व समांतर आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी कनिष्ठ महाविद्यालयांनी पारदर्शकपणे तयार कराव्यात. प्रवेशाच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांची गर्दी होऊ नये म्हणून कोविड-१९ चे नियम पाळण्यात यावेत. प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयाने स्वत:ची लिंक तयार करावी, अशा सूचना दिल्या. कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देताना प्रथम अनुदानित तुकडीत प्रवेश देण्यात यावा व त्यानंतर विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यता तुकडयांमध्ये प्रवेश देण्यात यावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
बैठकीसाठी जिल्हयातील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य ऑनलाईन उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, सातारा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष, जिल्हा सचिव एन. टी. निकम उपस्थित होते. ही ऑनलाईन मीटिंग पार पाडण्यासाठी ग्यान प्रकाश फौंडेशनचे प्रशांत भोसले यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे विषयतज्ज्ञ किरण शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट :
यावेळी त्यांनी गुणवत्तेनुसार व पारदर्शकपणे प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या. विहित क्षमतेपेक्षा जादा प्रवेश देऊ नये, तसेच नियमापेक्षा जास्त फी घेऊ नये, कोविड-१९ च्या संसर्गामुळे प्रवेशाच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून प्रवेशासाठी आवश्यक त्या प्रमाणात कक्ष स्थापन करावेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी विशेष भरारी पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. ही पथके कनिष्ठ महाविद्यालयास अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहेत.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
१८ ते २३ ऑगस्ट : फार्म देणे व स्वीकारणे
२४ ते २६ ऑगस्ट : अर्ज छाननी, तपासणी, निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करणे
२७ ऑगस्ट : दुपारी ३ पर्यंत निवड यादी व प्रतीक्षा यादी सूचना फलकावर लावणे
२८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर : निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे
२ ते ३ सप्टेंबर : प्रवेश शिल्लक असल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देणे
४ ते ६ सप्टेंबर : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन प्रक्रिया पूर्ण करणे.
ऑनलाईन का ऑफलाईन याबाबत स्पष्टता नाही!
अकरावीची प्रवेश प्रक्रिया १८ ऑगस्टला सुरू होऊन ६ सप्टेंबरला संपणार आहे. मंगळवार दि. ७ सप्टेंबरपासून अकरावीचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, हे वर्ग ऑनलाईन होणार की ऑफलाईन याविषयी अद्याप स्पष्टता नाही. पुढील काही दिवस कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर मगच प्रत्यक्ष वर्ग की ऑनलाईन वर्ग याबाबत सूचित करण्यात येणार आहे.
.............