कऱ्हाडात मूकमोर्चा
By Admin | Published: July 13, 2017 03:13 PM2017-07-13T15:13:51+5:302017-07-13T15:13:51+5:30
कोपर्डी अत्याचाराला एक वर्ष :शालेय विद्यार्थ्यांसह महिलांची उपस्थिती
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि.१३ : कोपर्डी येथील मराठा भगिनीवर झालेल्या अमानुष अत्याचारास गुरूवार, दि. १३ रोजी एक वर्ष झाले. मात्र, त्यानंतरही त्या नराधमांना फाशी झालेली नाही. त्याचबरोबर या खटल्याचे कामकाज आश्वासन देऊनही फास्ट ट्रॅक कोर्टात होत नाही. या पार्श्वभूमीवर मराठा बांधवांकडून कऱ्हाड तहसील कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी दहा वाजता निदर्शने करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन तरूण-तरूणी, महिला अशा मराठा समाजबांधवांनी उपस्थिती लावली होती.
मराठा समाज आरक्षणाची मागणीही अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठीही राज्य शासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे या मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांकडून यावेळी निदर्शने करण्यात आली. कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित मराठा भगिनीला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडून मंगळवार पेठेतून गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी लोकशाही आघाडी कार्यालय, जोतिबा मंदिर, शिवाजी हायस्कूल, बसस्थानक, दत्त चौक या मार्गे हा मूक मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला.