भररस्त्यात तडफडणाऱ्या गायीला उचलले जेसीबीने !
By admin | Published: July 8, 2016 11:09 PM2016-07-08T23:09:52+5:302016-07-09T00:57:10+5:30
तरुणांनी घेतला पुढाकार : पायाला जखम झाल्याने ‘गोमाता’ हतबल; पालिकेकडून मात्र हात वर; म्हणे ‘मेल्यावर सांगा... आम्ही तिला उचलतो’--लोकमत विशेष
भररस्त्यात तडफडणाऱ्या गायीला उचलले जेसीबीने !
तरुणांनी घेतला पुढाकार : पायाला जखम झाल्याने ‘गोमाता’ हतबल; पालिकेकडून मात्र हात वर; म्हणे ‘मेल्यावर सांगा... आम्ही तिला उचलतो’--लोकमत विशेष
साई सावंत --सातारा --साताऱ्यातील तपासे मार्ग... नेहमीप्रमाणेच वाहनांची वर्दळ... पण रस्त्यातच एक गाय खूप वेळ बसलेली... वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी गायीला हाकलण्याचा प्रयत्न केला; पण ती जखमी असल्याने उठू शकत नसल्याचे लक्षात आले. यासाठी पालिकेला मोबाईल संपर्क साधला; पण पालिकेनेही हात वर केले. शेवटी तरुणांनीच जेसीबी बोलावून तिला सुरक्षित ठिकाणी नेऊन उपचार केले.
येथील तपासे मार्गावर शुक्रवारी सकाळी भरगर्दीच्या वेळेत एक गाय जखमी अवस्थेत रस्त्याच्या मधोमध बसली होती. तरुणांनी तिला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला असता तिच्या पायाला गंभीर जखमी झाली असल्याचे लक्षात आले. त्यामुळे काही तरी उपाययोजना करणे गरजेचे होते.
तरुणांनी तत्काळ सातारा पालिकेशीसंपर्क साधून गायीला नेण्याचे आवाहन केले. त्यावेळी पालिकेनेही असमर्थता दाखवून हात वर केले. त्यानंतर वाईल्ड लाईफ संघटनेचे अमित सय्यद यांना बोलावण्यात आले. सय्यद यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून उपचार सुरू केले. त्यामुळे गायीमध्ये तरतरी आली. परंतु स्वत: उठून बाजूला जाता येईल एवढाही तिच्यात त्राण शिल्लक नव्हता.
गायीची होत असलेली तगमग पाहून तरुणांच्या काळजाचीही घालमेल होत होती. काही करून तिला बाजूला नेणे गरजेचे आहे, हे ओळखून त्यांनी प्रयत्न सुरू केले. जरंडेश्वर येथील गोशाळामध्ये फोन करून गाय घेऊन जाण्यास सांगितले असता. त्यांनीही ‘आमच्याकडे ऐंशी गायी आहेत. त्यामुळे घेऊन जाऊ शकत नाही,’ असे सांगितले. त्यामुळे शेवटी महेश तपासे यांचा जेसीबी बोलावला. जेसीबीच्या पुढील खोऱ्यातून तिला अलगद उचलून पोलिस मुख्यालयाशेजारील झाडाखाली ठेवले आहे. त्याठिकाणी गायीला पाणी पाजून चपाती खाण्यास दिली. ती पूर्ण बरी होईपर्यंत गायीला खाऊ पिऊ घालण्याची जबाबदारी परिसरातील रहिवाशांनी घेतली आहे. महेश तपासे, शौर्यशील माने, मयुर बैताडे, प्रसाद बाबर, किरण कल्पवृक्ष व मित्र मंडळाच्या तरुणांचे कौतुक होत आहे.