तन्वीन ठरली ज्युदोत सिक्रेट सुपरस्टार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:34 AM2019-02-11T00:34:11+5:302019-02-11T00:34:19+5:30
स्वप्नील शिंदे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : आमीर खानच्या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटात इनसियाने आपल्या स्वप्नांसाठी कुटुंब आणि समाजाशी ...
स्वप्नील शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आमीर खानच्या सिक्रेट सुपर स्टार चित्रपटात इनसियाने आपल्या स्वप्नांसाठी कुटुंब आणि समाजाशी केलेल्या संघर्षाची कहानी मांडली आहे. अशाच प्रकारचा संघर्ष करून तन्वीन तांबोळीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडियाच्या ज्युदो या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे.
तन्वीन तांबोळी ही मूळची सांगली जिल्ह्यातील विटा येथील असून, ती शिक्षणानिमित्त रहिमतपूर येथे आजोंबाकडे राहत होती. लहानपणापासून ती खेळामध्ये चमकत असल्याने तिचे आई-वडिलांनी दिला प्रोत्साहन दिले. तिची आई शिक्षिका व वडील नगरपालिकेत नोकरीत असल्याने त्यांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. त्यामुळे त्यांनी मुस्लीम समाजात असलेल्या पारंपरिक विचारांना छेद देत आपल्या मुलीला क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली.
त्यासाठी तिला पुणे येथील क्रीडा प्रबोधनीत प्रवेश घेतला. तिची तंदुरुस्ती व क्षमता पाहून क्रीडा शिक्षक राजीव देव यांनी ज्युदोवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला योग्य मानून तन्वीनने ज्युदोचा सराव सुरू केला. मधुश्री काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली तिचा नियमित सराव सुरू आहे. ज्युदोसारख्या खेळात करिअर करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांच्या समाजातील काही लोकांना आश्चर्य वाटले, थोडासा विरोधही झाला.
तिचे वडील रफिक व आई जास्मीन यांनी विरोधाला न जुमानता आपल्या मुलीच्या खेळाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. हळूहळू तन्वीने विविध स्पर्धांमध्ये पदक मिळविल्यानंतर समाजातील लोकांचा विरोध मावळला. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया महोत्सवातील ज्युदोत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. २१ वर्षांखालील वयोगटात तिने ७० किलोखालील विभागात यश संपादन केले आहे. त्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव झाला.