अवघ्या ५२ तासांत आळंदी ते पंढरपूर पायी वारी..
By admin | Published: July 2, 2017 04:39 PM2017-07-02T16:39:16+5:302017-07-02T16:39:16+5:30
२४५ किलोमीटरची पदभ्रमंती : लिम्का बुक आॅफ रिकॉर्डमध्ये होणार नोंद
आॅनलाईन लोकमत
लोणंद , दि. 0२ : आळंदी ते पंढरपूर हे माउलींच्या पालखी वारीचे २४५ किलोमीटर अंतर अवघ्या ५८ तासांत पायी चालून प्राजित परदेशी (रा. लोणंद) व धनाजी पन्हाळे (रा. उस्मानाबाद) या दोन युवकांनी रेकॉर्डब्रेक पंढरीची वारी केली असून, त्यांच्या या ऐतिहासिक वाटचालीची ह्यलिम्का बुक रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार असून ५८ तासांत पायी चालत पंढरीची वारी करून इतिहास घडवणाऱ्या या दोन अवलिया युवकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मानव जातीमध्ये जन्माला आल्यावर इतराप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगाण्यापेक्षा काहीतरी वेगळं साहसी, धाडसी काम करून आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी कमी वेळेत साहसी व रेकॉर्ड निर्माण होईल, अशी आळंदी ते पंढरपूर पायी पंढरीची वारी करण्याचा संकल्प चार अवलिया तरुणांनी केला, हा संकल्प सिद्धीस जाण्यासाठी प्राजित परदेशी (लोणंद) व धनाजी पन्हाळे (उस्मानाबाद), पारस पांचाळ (गुजरात), जयप्रकाश गुप्ता (यवतमाळ) या चार जणांनी अथक परिश्रम करून या चौघांनी आळंदी येथून या ऐतिहासिक वारीसाठी चालण्यास सुरुवात केली.
यावेळी भाजपाचे आमदार महेश लांडगे व आंळदीच्या नगराध्यक्षा यांनी या चौघांना झेंडा दाखवल्यावर या चौघांनी ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता ७१ किलोमीटर प्रवास केल्यावर या चौघांना थकवा जाणवू लागला. १११ किलोमीटर अंतर पार केल्यावर मात्र पारस पांचाळ व जयप्रकाश गुप्ता या दोघांनी प्रकृती खालावल्याने पायी वारीतून माघार घेतली. मात्र काहीही झाले तरी कमीतकमी वेळेत हे अंतर पूर्ण करून या वाटचालीची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद करून इतिहास निर्माण करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्राजित परदेशी व धनाजी पन्हाळे या दोघांनी आळंदी ते पंढरपूर ही पंढरीच्या वारीची २४५ किलोमीटर वाटचाल ऐतिहासिक वेळेमध्ये ५८ तासांत पूर्ण करून ते पंढरपूरमध्ये पोहोचले.
पंढरीच्या वारीमधील वारकरी हे २४५ किलोमीटर अंतर हरिनामाच्या गजरात १८ दिवसांत पूर्ण करतात, या अगोदर पुण्याच्या हिमांशू शके यांनी ही वाटचाल ७१ तासांमध्ये करून लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये आपले रेकॉर्ड नोंद केले होते. प्राजित परदेशी व धनाजी पन्हाळे यांनी हे रेकॉर्ड मोडीत काढले असून, या दोघांच्या ऐतिहासिक वाटचालीची लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये नोदं होणार असून, या दोघांनी ही वाटचाल करत असताना वायूसेनेमध्ये वीस वर्षे सेवा बजावणारे व लिम्का बुकमध्ये अनेक रेकॉर्ड नोंद असलेल्या जयंत डोके यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले आहे. तसेच या वाटचालीत प्राजित परदेशी व त्यांच्या सहकाऱ्यांना निमेश रावळ, दत्तात्रय भोईटे, आदित्य कांबळे, राहुल मोरे, शुभम दरेकर यांनी मदत केली आहे.
प्राजित परदेशी हे भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस असून, त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चद्रकांतदादा पाटील व भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रेकॉर्ड ब्रेक वारी केली आहे.
या इतिहास घडवणाऱ्या रेकॉर्डब्रेक वारीनंतर लोकमतशी बोलताना प्राजित परदेशी म्हणाले, पंढरीची वारी करण्याची मनापासून इच्छा होती; मात्र काही तरी वेगळे करून अविस्मरणीय वारी करण्याचा विचार डोक्यात आल्यावर ही कल्पना सुचली. वारी दोन सहकारी थांबल्यावर आत्मविश्वास कमी झाला होता. मात्र, ही संधी पुन्हा नाही असा विचार करत मार्गक्रमण केले. मात्र पंढरपूर जवळ आल्यावर विठ्ठल भेटीच्या ओढीने वेगळीच ऊर्जा मिळाली व हे रेकॉर्ड मी व धनाजी करू शकलो.