चाफळ, माजगाव चोरीप्रकरणी अल्पवयीन आरोपी ताब्यात, दुचाकीसह सुमारे ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:48 PM2022-05-27T13:48:46+5:302022-05-27T13:49:09+5:30
पोलिसांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याची सातारच्या बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.
चाफळ : चाफळ व माजगाव येथे चार महिन्यांपूर्वी चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. चाफळ व माजगाव येथे तीन ठिकाणी चोरट्यांनी धाडशी चोरी केली होती. तर माजगाव येथून एक नवी दुचाकीही चोरून नेली होती. याचा तपास सुरु असताना एका अल्पवयीन संशयीत मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक दुचाकीसह सुमारे ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाफळ येथील बसस्थानक परिसरात असलेले महेश कापड दुकान चोरट्यांनी फोडून काऊंटरमधील तीन हजारांची रोकड लंपास केली होती. तर चाफळ-माजगाव रस्त्यावर असलेल्या माणिक शिंदे यांच्या घरातून मोबाईल चोरला होता. त्यानंतर चोरट्यांनी याच रस्त्यावरील समृद्धी ढाबा फोडून काऊंटरमधील चार हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. तर माजगावातून अक्षय शामराव बोडके याची नवीन दुचाकी पळवली होती. या चोरी प्रकरणाचा तपास चाफळ पोलीस दुरक्षेत्राचे बीट अंमलदार मनोहर सुर्वे, सिद्धनाथ शेडगे करत होते.
खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी दुचाकी गाडी ताब्यात घेतली आहे. चार महिन्यामध्येच चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात चाफळ पोलिसांना यश मिळाले असले तरी या चोरी प्रकरणात सहभागी असणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे. या चोरीप्रकरणी पोलिसांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याची सातारच्या बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.
सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, या चोरी प्रकरणात चार चोरटे एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यामुळे या प्रकरणात सहभागी असणारे आणखी चोरटे मोकाट आहेत. लवकरच त्यांना ताब्यात घेणार असल्याचे पोलीस हवलदार सिध्दनाथ शेडगे यांच्या कडून सांगण्यात आले.