न्यायालयात सुनावणीवेळी ज्योती मांढरेला भोवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:35 AM2021-01-22T04:35:54+5:302021-01-22T04:35:54+5:30
सातारा : वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून गुरुवारी माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला भोवळ ...
सातारा : वाई हत्याकांड प्रकरणाची सातारा जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असून गुरुवारी माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला भोवळ आली. उलटतपास सुरू असताना ही घटना घडल्यानंतर न्यायालयाने तब्येतीची विचारपूस करून १५ मिनिटांचा ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा सुनावणी सुरू केली. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा जिल्हा न्यायालयत वाई हत्याकांडाची सुनावणी होणार आहे.
डॉ. संतोष पोळ याने वाई शहरासह परिसरातील सहा महिला, पुरुषांचे खून केले आहेत. खून केल्यानंतर सर्व मृतदेह धोम धरणालगत असलेल्या त्याच्या फार्म हाऊसमध्ये पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्यानंतर डॉ. संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती माफीची साक्षीदार झाली व डॉ. पोळ याने कशापद्धतीने हत्याकांड केले याचा पाढा वाचला.
सातारा जिल्हा न्यायालयात सध्या याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. गुरुवारी ते न्यायालयात आले होते.