‘काकस्पर्श’ होईना.. गावावर म्हणे कावळा रुसलाय!

By admin | Published: September 25, 2016 11:52 PM2016-09-25T23:52:30+5:302016-09-26T00:12:57+5:30

जखिणवाडीसह तीन गावांतील स्थिती : देवतांच्या मूर्ती रंगविल्या; शांतता विधीही केला, अंधश्रद्धेला खतपाणी, कावकाव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचा प्रयत्न

'Kaakpush' Hoina .. The village is called Kavala rosalaya! | ‘काकस्पर्श’ होईना.. गावावर म्हणे कावळा रुसलाय!

‘काकस्पर्श’ होईना.. गावावर म्हणे कावळा रुसलाय!

Next

संजय पाटील ल्ल कऱ्हाड
पितृपक्ष पंधरवड्यामुळे सध्या गावोगावी कावळ्यांना नैवेद्य दिला जातोय. बहुतांश गावात या नैवेद्याला ‘काकस्पर्श’ही होतोय; पण कऱ्हाड तालुक्यातील जखिणवाडी गावचं दुखणं वेगळंच आहे. या गावातील स्मशानभूमीकडे गेल्या पंचवीस वर्षांत कावळाच फिरकलेला नाही. त्यामुळे गावावर कावळे रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे पसरलीय. कावळ्यांना ‘खूश’ करण्यासाठी गावाने हरतऱ्हेचे प्रयत्न केलेत; मात्र परिस्थिती बदललीच नाही.
जखिणवाडीची स्मशानभूमी. वेळ सकाळी दहा ते अकराची. अंत्यविधीसाठी ठाव मांडलेला; पण दूरवर कावळ्यांचा मागमूसही नाही. ग्रामस्थांनीही पूर्वानुभवाने हेच गृहित धरलेलं. अखेर गाईने नैवेद्य शिवला अन् आप्तस्वकीय, पै-पाहुण्यांसह भावकी मार्गस्थ झाली. गावात हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू आहे. गेल्या पंचवीस वर्षांत एकही ‘ठाव’ कावळ्याने शिवला नसल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थ सांगतात. नदीकाठावर गर्द झाडीत स्मशानभूमी असूनही नैवेद्य शिवायला कावळा येत नाही, हीच सल ग्रामस्थांच्या मनात आहे. सर्वसाधारणपणे गर्द झाडी व नदीकाठच्या विस्तारलेल्या झाडांवर कावळ्यांचे वास्तव्य असते. उंच झाडावर फांदीच्या बेचक्यात हा पक्षी काट्याकुट्यांचे ओबडधोबड घरटे बांधतो़ तेथेच तो समूहाने वास्तव्य करतो; पण सध्या काट्याकुट्याची घरटी ओकीबोकी पडलीयेत. कावळा दृष्टीस पडणे दूरच; पण दूरवरून त्याची ‘कावकाव’ही ऐकायला येत नाही. कावळे गावावर रुसलेत, अशी अंधश्रद्धाच येथे निर्माण झालीय. कावळ्यांना खूश करण्यासाठी अंधश्रद्धेतून येथे अनेक मार्ग काढले जातायत़ वेगवेगळे विधी केले जातायत; पण परिस्थिती बदलत नाही, असे येथील ग्रामस्थ
सांगतात.
‘कावळ्यांची संख्या कमी झाली, असं म्हणावं तर शिवारात कावळे दिसतात. मात्र, ते स्मशानभूमीकडे फिरकत का नाहीत, याचं कोडं आम्हाला उलगडेना.’ जखिणवाडीचे माजी सरपंच रामराव नांगरे-पाटील ‘लोकमत’ला सांगत होते़, ‘एका ज्योतिषानं सांगितल्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी आम्ही गावातील सर्व देवतांच्या मूर्ती रंगविल्या़ स्मशानभूमीत शांतता विधी केला; पण कावळ्यांची नाराजी दूर झालेली नाही़ सर्व देवतांना नैवेद्य देऊनही या समस्येतून मार्ग निघालेला नाही़’
तालुक्यातील चचेगावातही हीच स्थिती आहे़ कावळे रुसल्याचा समज करून घेऊन ग्रामस्थ ‘उपाय’ शोधण्याच्या मार्गावर आहेत़ ‘काही वर्षांपूर्वी अंत्यविधीचा नैवेद्य शिवायला एकतरी कावळा यायचा; पण सध्या स्मशानभूमीत एकही कावळा दिसत नाही. अंत्यविधीवेळी कावळ्याची वाट पाहणंच आता आम्ही सोडून दिलंय़, असं तेथील ग्रामस्थ सांगतात. नारायणवाडीतही कावळ्याची वाट पाहत नाहीत. वाट पाहणं व्यर्थ ठरतंय, असं ग्रामस्थांचंही मत आहे. अंत्यविधीवेळी ग्रामस्थ गाय घेऊन येतात. गाईने नैवेद्य शिवला तर ठिक नाही तर तो नदीपात्रात सोडला जातो, असं काही ग्रामस्थ सांगतात.
डोमकावळा अन् गावकावळा...
कावळा हा पक्षी वर्गाच्या ‘काक’ कुलातील पक्षी आहे़ ‘गावकावळा’ व ‘डोमकावळा’ असे त्याचे दोन प्रकार आहेत़ गावकावळ्याच्या रंगात किंचित हिरवट, निळसर किंवा जांभळ्या रंगाची झाक असते़ मानेभोवती, पाठीकडे आणि छातीवर करडा किंवा राखाडी रंग असतो़ डोमकावळा दणकट असतो़ त्याची चोच अधिक धारदार आणि बळकट असते़ तसेच सर्वांगावर चकचकित काळाभोर रंग असतो़
दीड वर्ष स्मशानभूमीत नैवेद्य

जखिणवाडीच्या ग्रामस्थांनी कावळ्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केलेत. स्मशानभूमीत दररोज नैवेद्य ठेवावा, असे एकदा सांगण्यात आले. त्यानुसार ग्रामस्थांनी सलग दीड वर्ष दररोज स्मशानभूमीत गोडाचा नैवेद्य ठेवला. दररोज एका घरातून हा नैवेद्य जायचा. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. एकही नैवेद्य कावळ्याने शिवला नाही.
सर्वभक्षी असूनही कावळा गायब!

कावळा सर्वभक्षीय आहे़ त्यामुळे भक्ष्य उपलब्ध नसल्याने त्याची संख्या घटली, असे म्हणणे उचीत ठरणार नाही़ ‘स्वच्छतादूत’ म्हणून हा पक्षी परिचित आहे़ तसेच छोट्या पक्ष्यांची पिले तो खातो़ पिकांवरील कीटकनाशकांच्या वापरामुळे कावळ्यांवर दुष्परिणाम झाला असल्याने त्यांची संख्या घटल्याचा एक निष्कर्ष काढण्यात आला आहे. पण हेच मूळ कारण आहे का, याची कारणमीमांसा करण्याचे आव्हान पक्षीतज्ज्ञांसमोर आहे़
खाद्य आणि सुरक्षितता असेल त्याठिकाणी कावळा हमखास असतो. तो सर्वभक्षी आहे. शिवारात मोठ्या प्रमाणावर खाद्य असेल तर कावळे स्मशानभूमीकडे फिरकत नसावेत किंवा स्मशानभूमी परिसरात त्यांना सुरक्षितता वाटत नसावी. कीटकनाशकांच्या अती वापराचा पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, कावळ्यांची संख्या कमी झाली असे म्हणता येत नाही. सर्वत्र कावळ्यांचे वास्तव्य व वावर आहे.
- सुधीर कुंभार, संचालक, एम. एन. रॉय पर्यावरण संस्था
जखिणवाडी गावावर कावळ्यांचा रुसवा आहे. आजपर्यंत याबाबत आम्ही अनेकांचे मार्गदर्शन घेतले आहे. गावची स्मशानभूमी गर्द झाडीत आहे. मात्र, या झाडीत एकही कावळा येत नाही. याचे कारण अद्याप आम्हाला समजलेले नाही. अनेक वर्षांपासून ही परिस्थिती आहे.
- रामदादा पाटील,
ग्रामस्थ, जखिणवाडी
 

Web Title: 'Kaakpush' Hoina .. The village is called Kavala rosalaya!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.