‘कास’चा पर्यटनदृष्ट्या विकास साधणार - उदयनराजे
By सचिन काकडे | Published: September 3, 2023 04:31 PM2023-09-03T16:31:33+5:302023-09-03T16:32:51+5:30
जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला असून, हे पठार रविवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
सातारा : हाताला काम नसल्याने कास पठार व परिसरातील अनेक भूमिपुत्रांना विस्थापित व्हावे लागले. ही परिस्थिती बदलून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘कास’चा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाईल, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.
जागतिक वारसा स्थळात समाविष्ट झालेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला असून, हे पठार रविवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. या हंगामाचा शुभारंभ केल्यानंतर खा. उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, वनविभागाचे अधिकारी व कास वन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, ‘कास पठारावरून महाबळेश्वरकडे जाणारा जुना राजमार्ग खुला झाला तर महाबळेश्वर, पाचगणीतील पर्यटकदेखील कास पठाराला भेट देतील. पर्यटकांची संख्या वाढली तर आपसूकच या भागाचे चलन-वलनही वाढेल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घ्यावा.
पूर्वी हाताला काम नसल्याने स्थानिकांचे मुंबई, पुणे येथे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. आता परिस्थिती बदलली आहे. अलीकडच्या काही वर्षांत हा परिसर विकसित होऊ लागला आहे. पर्यटन वाढू लागले आहे. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. कास पठार व परिसर हा अत्यंत सुंदर आहे. याची जपणूक करणं, तो स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पर्यटकांनीदेखील सामाजिक जबाबदारीतून पठाराचे सौंदर्य अबाधित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले