पाणीदार गावासाठी रणरागिणींच्या हाती कुदळ अन फावडे
By admin | Published: April 17, 2017 01:01 PM2017-04-17T13:01:14+5:302017-04-17T13:01:14+5:30
भोसरे ग्रामस्थ एकवटले : श्रमदानातून पाण्याचा प्रत्येक थेंब अडविण्याचा केला निर्धार
आॅनलाईन लोकमत
खटाव (जि. सातारा), दि. १७ : श्रमदानातून एकीच्या बळावर गावाचा कायापालट करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भोसरे गावाने वॉटर कप स्पर्धेत आपला सहभाग नोंदवत असतानाच केवळ स्पधेर्पुरते या कामाकडे न बघता आपल्या पुढील पिढीला या कामातून अधिकाधिक फायदा कसा घेता येईल या दृष्टीने काम करण्याचा निर्धार केला आहे. उन्हाचा विचार न करता पावसात पडणाऱ्या पाण्याचा एक न एक थेंब अडविण्यासाठी आणि गाव पाणीदार करण्यासाठी हजारो हात न थकता राबत आहेत.
पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना दृढ होत असताना शासनाने जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पधेर्तूनही गावागावातून जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. दुष्काळी हा शब्द पुसून टाकण्यासाठी सध्या बऱ्याच गावांतून पाण्याचे योग्य नियोजन करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. भोसरे गावाने एकजुटीच्या माध्यमातून वॉटर कप स्पधेर्साठी कंबर कसली आहे. आपापसातील मतभेद विसरून गावाच्या विकासासाठी सर्वांना एकत्र आणण्याचे काम या गावचे सुपुत्र कुलाबा तहसीलदार पदावर कार्यरत असणारे विश्वास गुजर यांनी केले आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरे गावातील आबालवृद्धांसमवेत मोठ्या संख्येने महिला वर्ग या कामासाठी श्रमदान करण्याकरिता बाहेर पडला आहे. गावातील सर्व बचत गट, महिला मंडळ तसेच महिला संघटनांचा सहभाग लक्षणीय आहे. हातात कुदळ, फावडे तसेच पाटी घेऊन कामाला लागल्यामुळे ज्यामुळे आता या कामाला वेगळीच दिशा प्राप्त झाली आहे. श्रमदानाचे महत्त्व तसेच लोकसहभाग असल्याशिवाय कोणतेच काम उठावदार होऊ शकत नाही आणि म्हणूनच भोसरे गावाने एकसंधतेच्या जोरावर ही स्पर्धा सर करण्याचा निश्चय केला आहे. (वार्ताहर)
बंधारे गाळमुक्त, ओढ्यांचे खोलीकरण
गावकऱ्यांच्या श्रमदानातून मनुष्यबळाद्वारे मृदा व जलसंधारणाची कामे करत असतानाच शोषखड्डे, बांधावर वृक्षलागवड करण्याचे काम सुरू आहेत. जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढणे, माती बांध घालणे, समतोल चर काढणे, जुन्या विहिरी तसेच ओढ्याची दुरुस्ती व खोलीकरण करणे आदी कामांनी गती घेतली आहे. गावातील सुमारे एक हजार महिला, पुरुष, युवक, युवती तसेच त्यांच्या समवेत गावातील विविध पदांंवर कार्यरत असलेले पदाधिकारी एकत्र येऊन श्रमदान करीत आहेत.