तांबवे गटातील ग्रामपंचायतीत ‘कही खुशी, कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:07+5:302021-01-19T04:39:07+5:30
तांबवे : तांबवे (ता. कऱ्हाड) जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तांबवे ...
तांबवे : तांबवे (ता. कऱ्हाड) जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत निवडणुकीत ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था झाली आहे. तांबवे ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून साजूर, मौजे साकुर्डी, वस्ती साकुर्डी या ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे. म्होप्रेत रयत आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.
तांबवे ग्रामपंचायतीत दहा वर्षांनी सत्तांतर झाले. तेरा जागांपैकी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीला ८ जागा मिळाल्या. आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, रामचंद्र पाटील, पी. डी. पाटील, सतीश पाटील यांनी केले. तर विरोधी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल गटाला ५ जागा मिळाल्या. त्याचे नेतृत्व यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष निवासराव पाटील, उपसरपंच धनंजय ताटे, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब पाटील हे करीत होते.
साजुर ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांच्या गटाने सत्ता अबाधित ठेवत नऊपैकी ६ जागांवर विजय मिळविला. तर उंडाळकर गटाच्या खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांच्या गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. म्होप्रे ग्रामपंचायतीत सर्वच नऊ जागांवर रयत विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. त्याचे नेतृत्व माजी सरपंच तुकाराम डुबल, संभाजी सपकाळ व पिनु पाटील यांनी केले. विरोधी विद्यमान पंचायत समिती सदस्या संगीता संकपाळ यांच्या गटाला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. वस्ती साकुर्डी येथील ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला ६ जागा मिळवून सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले. तर विरोधी पाटणकर गटाला ३ जागा मिळाल्या.
मौजे साकुर्डी ग्रामपंचायतीची सत्ता अबाधित ठेवत अॅड. विश्वास निकम, निवास शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या जोतिर्लिंग गटाने ५ जागांवर विजय मिळविला. तर विरोधकांना २ जागांवर समाधान मानावे लागले. गमेवाडी ग्रामपंचायतींमध्ये सातपैकी ३ जागा बिनविरोध झाल्या. तर ४ सदस्य निवडून आणून मंत्री शंभूराज देसाई गटाने सत्ता मिळवली. संतोष जाधव यांनी विजयी पॅनेलचे नेतृत्व केले. बेलदरे ग्रामपंचायतीमध्ये सातपैकी शंभूराज देसाईं व उंडाळकर गटाला ४ जागांवर विजय मिळवता आला. तर विरोधी गटाने ४ जागांवर विजय मिळविला.
- चौकट
वसंतगड ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना चपराक
तांबवे जिल्हा परिषद गटातील वसंतगड ग्रामपंचायत यापूर्वीच बिनविरोध झाली असून तेथे सत्तांतर झाले आहे. खरेदी-विक्री संघाचे माजी सभापती रघुनाथ नलवडे यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करत विरोधकांना चपराक दिली आहे. किरपे ग्रामपंचायतही यापूर्वी बिनविरोध झाली आहे. तेथेही आघाडीची सत्ता आहे. गमेवाडीत सत्ता अबाधित राहिली आहे.
फोटो : १८केआरडी०३
कॅप्शन : तांबवे, ता. कऱ्हाउ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.