माहुलीच्या घाटावर कावळ्यांची जत्रा!

By Admin | Published: September 30, 2015 09:22 PM2015-09-30T21:22:05+5:302015-10-01T00:30:10+5:30

पितृ पंधरवडा : पुराणकथेनुसार यमराजाचे प्रतीक असलेल्या कावळ्याला महत्त्व

Kajolara jatra on Mahuli Ghat! | माहुलीच्या घाटावर कावळ्यांची जत्रा!

माहुलीच्या घाटावर कावळ्यांची जत्रा!

googlenewsNext

सातारा : एरव्ही कोणाच्याही खिजगणतीत नसलेल्या कावळ्यांची गेल्या दोन दिवसांपासून संगममाहुलीच्या कृष्णाघाटावर जणू जत्रा भरलेली दिसतेय. त्याला निमित्तही तसंच आहे. पितृपक्ष सुरू झाला आहे. पितरांचा आत्मा शांत करण्यासाठी घाटावर श्राद्ध घातले जाते. यासाठी चमचमीत पदार्थांचा नैवेद्य ठेवला जातो अन् तो खाण्याचा मान असतो तो कावळ्यांना. हेच कारण आहे की, कृष्णा घाटावर कावळ्यांची गर्दी वाढली आहे.पितृ पंधरवड्यात श्राद्ध नदीकाठी घालावे, असा संकेत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून संगममाहुली येथील घाटावर श्राद्धविधी सुरू झाले आहेत. विधीसाठी वरण-भात, पुरी, भजी, वडे, कढी, चटणी, कोशिंबीर, रव्याची, तांदळाची खीर किंवा लापशी, भाज्या, याशिवाय ज्याचे श्राद्ध घालायचे आहे त्याच्या आवडीच्या पदार्थांचाही यामध्ये समावेश असतो. पिंडदान हा यातला महत्त्वाचा विधी असतो. पिंडाला कावळा शिवल्याशिवाय श्राद्धविधी पूर्ण होत नाही. श्राद्धविधीमध्ये यम, विष्णू आणि शंकर या तीन देवतांची पूजा केली जाते. कावळा हा यमराजाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याने पिंडाला स्पर्श केला, त्यातील अंश भक्षण केला की श्राद्ध पितरांपर्यंत पोहोचते, अशी श्रद्धा आहे. बुधवारी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचा दरवळ घाटावर पसरला होता. त्या वासाने कधी नव्हे तो कावळ्यांनी नदीकाठच्या झाडांवर गर्दी केलेली दिसत होती.
पूजापाठ उरकून पुरोहितासह माणसं तिथून उठली की पोटपूजेसाठी कावळ्यांचा थवा नैवेद्याभोवती बसत होता. कुणी तळलेली पुरी चोचीत घेऊन झाडावर जाऊन बसत होता, तर कुणी भज्याची चव चाखत होता. कुणी वरण-भातावर चोच मारत होता, तर कुणी गोड खिरीचा आस्वाद घेत होता. गेल्या दोन दिवसांपासून कृष्णाघाटावर कावळ्यांना अशी ‘मानाची मेजवानी’ मिळू लागली आहे. त्यामुळे कृष्णाघाट ‘कावळ्यांचा घाट’ बनला आहे. (प्रतिनिधी)

अशी आहे पितृपक्षाची पुराणकथा
महाभारताच्या युद्धात कणार्चा मृत्यू झाला व त्याच्या आयुष्यभरातील पुण्यकृत्यामुळे तो स्वर्गवासाला पात्र ठरला. परंतु स्वर्गाच्या द्वारापाशी त्याला अडवले गेले. तू आयुष्यात सोने, चांदी, हिरे, माणके, एवढेच नव्हे तर स्वत:ची कवचकुंडलेही तू दान केलीस. परंतु तू तुझ्या आयुष्यात कधीही अन्नदान केलेले नाही तसेच पितरांना श्राद्धविधीच्या रुपाने अन्नदान केलेले नाही. त्यामुळे तुला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. असे सांगितले गेले. त्यानंतर यमराज आणि चित्रगुप्तांनी कणार्ला पुन्हा पंधरा दिवस पृथ्वीवर पाठविले आणि या काळात कर्णाने अन्नदान केले तसेच आपल्या पूर्वजांचे श्राद्धविधी केले. कर्ण ज्या काळात म्हणजे पंधरवड्यात पुन्हा पृथ्वीवर आला होता तो काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला, असे पुराणात सांगितले आहे.

Web Title: Kajolara jatra on Mahuli Ghat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.