काकांचा सत्कार; पुतण्याचा निषेध !

By Admin | Published: August 26, 2016 11:20 PM2016-08-26T23:20:29+5:302016-08-26T23:29:36+5:30

साखर कामगार मेळावा : जरंडेश्वर व्यवस्थापनाकडून कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप

Kaka felicitation; Prohibition of repetition! | काकांचा सत्कार; पुतण्याचा निषेध !

काकांचा सत्कार; पुतण्याचा निषेध !

googlenewsNext

वाठार स्टेशन : साखर कामगारांना १५ टक्के वेतन वाढ दिल्याबद्दल माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा जयघोष करत त्यांचा कोरेगावात जाहीर सत्कार करण्याचा निर्धार केला आहे. जरंडेश्वर शुगर मिल्स या कारखान्यातील व्यवस्थापनाकडून कामगार वर्गावर होत असलेल्या अन्यायकारक भूमिकेचा निषेध करत जरंडेश्वर शुगर मिल्सचे सर्वेसर्वा अजित पवार यांचा अप्रत्यक्षपणे निषेध करण्याची भूमिका जिल्हा समन्वय समितीच्या निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कोरेगावच्या राजकारणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कोरेगाव येथील एका मंगल कार्यालयात जिल्ह्यातील साखर कामगारांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास महाराष्ट्र साखर कामगार राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, रावसाहेब पाटील, दिनकरराव पाटील, जरंडेश्वर कामगार युनियनचे अध्यक्ष किरण बर्गे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, ‘राज्यातील साखर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना जरंडेश्वर मधील कामगारांच्या पाठीशी ठाम आहे. कामगारांबाबत कारखाना व्यवस्थापनाने सलोख्याची भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यातील कामगारांच्या रोषाला व्यवस्थापनाने सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. साखर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून शरद पवार यांचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्यामुळेच या कामगारांना १५ टक्के एवढी पगारवाढ मिळाली आहे. याबद्दल त्यांचा गौरव व्हावा.
यावेळी जरंडेश्वर साखर कामगार युनियनचे दुष्यंत शिंदे म्हणाले, ‘साखर कारखान्यातील कामगारांना १५ टक्के एवढी पगार वाढ ही केवळ शरद पवार यांच्यामुळेच मिळाली याबद्दल त्यांचा सप्टेंबर महिन्यात कोरेगावातच जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.’
जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि या खासगी व्यवस्थापनाकडून सध्या कारखान्यातील कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जात आहे. कोणतेही कारण नसताना मध्यंतरी कारखान्याच्या ५ ते ६ कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले तर काही कुशल कामगारांच्या बदल्या अकुशल कामगार म्हणून केल्या जात आहेत, व्यवस्थापनाने भूमिका बदलली नाही तर कामगार व्यवस्थापनाविरोधात रस्त्यावर उतरण्यास कमी पडणार नाहीत. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)


समन्वय समितीची महिन्याला बैठक
जिल्ह्यात साखर कामगारांची एकी असावी एखाद्या कारखान्यात कामगारावर व्यवस्थापन अन्याय करत असेल तर संघटितपणे या व्यवस्थापनाला विरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी एकत्रित आले पाहिजे, यासाठी आजच्या मेळाव्यात जिल्हा समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या समितीत प्रत्येक कारखान्याचे ३ प्रतिनिधी राहणार असून, प्रत्येक महिन्याला या समितीची बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

Web Title: Kaka felicitation; Prohibition of repetition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.