साताऱ्यातील कचरा, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून कल्पनाराजे भोसले आक्रमक, आरोग्य निरीक्षकांची केली कानउघडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 01:53 PM2024-10-02T13:53:40+5:302024-10-02T13:54:34+5:30

साताऱ्यातील कचरा, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून धरले धारेवर

Kalpanaraje Bhosle is aggressive on the issue of garbage and stray dogs in Satara city | साताऱ्यातील कचरा, भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून कल्पनाराजे भोसले आक्रमक, आरोग्य निरीक्षकांची केली कानउघडणी

संग्रहित छाया

सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सातारा शहरातील कचरा व भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून कल्पनाराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मंगळवारी सकाळी त्यांनी पालिकेतील आरोग्य निरीक्षकांची कानउघडणी करतानाच कामकाजात कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला.

पालिकेच्या आराेग्य विभागाकडून कचरा संकलनाचे काम नियमित केले जात आहे. तरीदेखील शहर व हद्दवाढ भागात रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचत असतात. आरोग्य विभागाकडून हा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नसल्याने ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनू लागली आहे. याशिवाय शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या व त्यांचा उपद्रवही वाढला आहे. आरोग्य विभागाकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून वारंवार केला जात आहे. या सर्व प्रश्नांकडे राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी सकाळी त्यांनी आरोग्य निरीक्षकांना चांगलेच धारेवर धरले.

आरोग्य विभागप्रमुख प्रकाश राठोड यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना त्यांनी स्वतःच्या वाहनात बसवून शहराचा फेरफटका मारला. ठिकठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शहर व परिसराची वेळोवेळी स्वच्छता करणे पालिकेची जबाबदारी आहे. त्यामुळे स्वच्छतेचा विषय अधिकाऱ्यांनी अधिक गांभीर्याने घ्यावा. शहराच्या प्रवेशद्वारावरही कचऱ्याचे ढीग साचतात. हा भाग पालिका हद्दीत नसल्याचे कारण सांगून कोणीही जबाबदारी झटकू नये. हद्दवाढ भागासह उपनगरातही स्वच्छतेची कामे प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

..तर ठेकेदारांवर कारवाई करा

रस्त्यांवरील कचरा नियमित उचलला जात नाही. त्यामुळे कामकाजात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. ही संख्या व उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही कल्पनाराजे भोसले यांनी केल्या.

Web Title: Kalpanaraje Bhosle is aggressive on the issue of garbage and stray dogs in Satara city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.