टीम वाईच्या सदस्यांकडून कळसुबाई मोहीम फत्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:40+5:302021-02-19T04:29:40+5:30

वाई : ‘आरोग्य हीच धनसंपत्ती मानून वाई येथील टीम वाई मॅरेथॉनच्या सदस्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली आहे, याच ...

Kalsubai expedition from Team Y members | टीम वाईच्या सदस्यांकडून कळसुबाई मोहीम फत्ते

टीम वाईच्या सदस्यांकडून कळसुबाई मोहीम फत्ते

Next

वाई : ‘आरोग्य हीच धनसंपत्ती मानून वाई येथील टीम वाई मॅरेथॉनच्या सदस्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली आहे, याच आवडीतून विविध गडकिल्लांवर गिर्यारोहण करत नुकतेच महाराष्ट्रातील सर्वोच्च अशा कळसुबाई शिखरावर भारतीय ध्वज फडकावत, जणू वाईकर नागरिकांना फिटनेसचा कानमंत्र दिला.

यापूर्वी ग्रुपच्यावतीने वासोटा ट्रेक केवळ ४० मिनिटांत, तर कळसुबाई ट्रेक फक्त १ तास २० मिनिटांत पूर्ण करून अनेक दुर्गप्रेमींना प्रेरणा दिली आहे.

वाई शहर व वाई तालुक्यात नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जाणिवा निर्माण व्हाव्यात, यासाठी टीम वाईचे सदस्य प्रयत्नशील असतात. वाईकरांच्या मनात धावण्याची आवड रुजवण्यास यशस्वी ठरले आहेत. दोन यशस्वी गरवारे हिलसाईड हाफ मॅरेथॉनच्या आयोजनानंतर कोरोना कालावधीत रुग्णांना जेवण वाटप, गरजूंना अन्नधान्य वाटप व वृक्षारोपण यासारख्या कार्यास टीमने हातभार लावला.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वाईकरांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टिकोनातून द्रविड हायस्कूल वाई येथे रोज सकाळी ६ ते ८ या वेळेत मोफत फिटनेस सेंटर सत्र सुरू केले आहे.

टीम वाई, गडकिल्ल्यांची भटकंती करत ट्रेकिंगची आवड समाजात निर्माण कशी होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. चंदन वंदन, केंजळगड, कमळगड पांडवगड, सोनजाई, वासोटा व नुकतीच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असणाऱ्या कळसुबाई शिखर ट्रेकिंग मोहीम टीम वाईने फत्ते केली. यावेळी वाई शहरातील २५ ट्रेकर्ससह अथर्व फाैंड्रीचे नाईक, पुणे शहराचे एसीपी प्रकाश धस, विनायक नाईक, राजगुरू कोचळे, गिरीश गाढवे, विलास माळी, धोंडिराम वाडकर, महावीर कुपाडे, गोपाळ गरुड, अमृत देशमुख, नितीन देसाई, नंदकुमार डोईफोडे, उदय घाटगे, अनिल कोचळे, नितीन जगताप, चंद्रकांत सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कोंडलाडे, दिलीप जामदार, वीरेंद्र काळे, शौर्य कोचळे, विघ्नेश जगताप, क्षीतिज घाटगे, आदित्य भोसले, शिवम कापले सहभागी झाले होते.

चौकट..

ट्रेक केल्याचा आनंद अविस्मरणीय...

महाराष्ट्रातील सर्वोच्च १६४६ मीटर उंचीचे कळसुबाई शिखर चढताना थोडेसे मनावर दडपण होते; परंतु पहाटेची वेळ, सुंदर वातावरण आणि टीमचा उत्साह यामुळे कमी वेळेत ट्रेक पूर्ण झाला. तीन अवघड टप्पे पूर्ण करताना थोडा थकवा जाणवला; मात्र ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद अविस्मरणीय होता.

- गोपाळ गरुड, शिक्षक, द्रविड हायस्कूल, वाई

फोटो आहे..

१८वाई

टीम वाईच्या सदस्यांकडून कळसुबाई मोहीम फत्ते करण्यात आली. त्यानंतर सदस्यांनी शिखरावर तिरंगा ध्वज फडकविला.

Web Title: Kalsubai expedition from Team Y members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.