निमित्त कार्यशाळेचे; चर्चा बाजार समिती निवडणूक चाचणीची!, कराड तालुक्यातील राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:44 PM2022-11-23T13:44:52+5:302022-11-23T13:45:19+5:30

बदलत्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी या निवडणुकीत नेमकं काय होणार? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू

Karad Agricultural Produce Market Committee Election Environment | निमित्त कार्यशाळेचे; चर्चा बाजार समिती निवडणूक चाचणीची!, कराड तालुक्यातील राजकारण

निमित्त कार्यशाळेचे; चर्चा बाजार समिती निवडणूक चाचणीची!, कराड तालुक्यातील राजकारण

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : गत आठवड्यात कराडात सहकार सप्ताह निमित्त तालुक्यातील विकास सोसायटीच्या संचालकांची एक कार्यशाळा संपन्न झाली. माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेने चर्चा मात्र बाजार समिती निवडणूक चाचणीची सुरू झालीय!

महाराष्ट्र राज्य सहकार बोर्ड व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या वतीने सहकार सप्ताह आयोजित केला होता. त्या निमित्ताने तालुक्यातील विकास सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार, माजी सरकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील ,उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक लहूराज जाधव, ऋतुजा पाटील आदींची उपस्थिती होती.

विकास सोसायटीच्या संचालक मंडळांला प्रशिक्षीत करणे, त्यांचा सोसायटीच्या कामात प्रत्यक्ष सहभाग वाढवणे हा उद्देश असल्याचे यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र त्यानिमित्ताने संधी साधत बाजार समिती निवडणुकीच्या मतदारांशी संपर्क साधण्याची संधी आमदार बाळासाहेब पाटील यांनी साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

कराड शेती उत्पन्न बाजार समितीवर अपवाद वगळता उंडाळकर गटाचेच वर्चस्व राहिले आहे. पण बदलत्या राजकीय समीकरणांमुळे यावेळी या निवडणुकीत नेमकं काय होणार? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या त्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने या निवडणुकीची चर्चा जरा जास्त सुरू आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष निवडणूक होईल असेही बोलले जात आहे.

सन २००८पर्यंत कराड बाजार समितीवर दिवंगत विलासराव पाटील -उंडाळकर गटाची प्रदीर्घकाळ सत्ता राहिली आहे. पण २००८ ला तालुक्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली. आणि ऐतिहासिक सत्तांतर झाले. पण याच महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याने पुन्हा सन २०१५ साली उंडाळकर गटाने पुन्हा सत्ता ताब्यात घेतली. आता कोरोनामुळे लांबलेली निवडणूक जानेवारीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नेत्यांची चाचपणी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून सहकार सप्ताहाच्या कार्यशाळेत नेत्यांनी अप्रत्यक्ष चाचपणी केल्याची चर्चा आहे.

त्यांनी व्यक्त केला खेद

कराड तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका .त्यामुळे येथे विकास सोसायट्यांची संख्याही मोठी आहे. त्याच विकास सोसायटी गटातून आमदार बाळासाहेब पाटील सध्या जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व करीत आहेत. मात्र सोसायट्यांची संख्या मोठी असूनही कार्यशाळेला तुलनेने उपस्थिती कमी आहे असे सांगत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात खेद व्यक्त केला .

प्रारूप मतदार यादी कार्यक्रम सुरू

कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम सध्या सुरू आहे. १४ नोव्हेंबरला ही यादी प्रसिद्ध झाली असून बुधवार दिनांक २३ पर्यंत यावर हरकती साठी मुदत आहे. हरकतींवर २ डिसेंबर पर्यंत निर्णय होणार असून ७ डिसेंबरला ही यादी अंतिम होणार आहे. त्यामुळे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

राजकीय नांगरट आणि दिशाही स्पष्ट

सध्या तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते ,उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील व भाजपचे  दक्षिणचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्यात सख्य निर्माण झाले आहे. भोसले यांच्या मदतीनेच बाळासाहेबांनी जिल्हा बँक निवडणुकीत अँब.उदयसिंह पाटील यांचा पराभव केला आहे. आता बाजार समितीच्या निवडणुकीतही हे दोघेच एकत्र लढणार याचे संकेत वेळोवेळी मिळत आहेत. गोळेश्वरच्या कार्यक्रमात त्या दोघांनी यासाठीच राजकीय नांगरट केली आहे. तर वहागावच्या कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना दिशाही स्पष्ट दाखवली आहे.

उत्तरेतील भाजप मात्र वेगळ्या पवित्र्यात

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते मनोज घोरपडे व धैर्यशील कदम यांनी मात्र सर्व निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात काम करण्याचेही या दोघांनी ठरवले आहे

Web Title: Karad Agricultural Produce Market Committee Election Environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.